दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ? मुख्यमंत्री ठरत नसताना अजित पवारांची दिल्लीवारी

बारामती : राज्यामध्ये विधानसभा(politics) निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी राजकारण जोरदार सुरु आहे. महायुतीकडे एकतर्फी बहुमत असताना देखील त्यांनी अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यामध्ये आता राज्यातील नाराजीनाट्य सुरु असताना अजित पवार यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(politics) यांची सध्या प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्यानंतर देखील आल्यावर त्यांनी सर्व बैठकी रद्द केल्या होत्या. प्रकृतीमुळे आणि राजकीय नाराजीमुळे एकनाथ शिंदे हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचावरचा दावा सोडला असला तरी देखील त्यांनी गृहखाते व नगर विकास खात्यांचा दावा केला होता. मात्र हे भाजपला मान्य नाही. आता नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा दावा देखील सोडला असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचा निकाल लागून 10 दिवस उलटून गेल्यानंतर देखील सरकार स्थापन होत नसल्यामुळे टीका सुरु आहे. यामध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अद्याप खात्यांवर बोलणी सुरु आहे. असे असताना आता मीडिया रिपोर्टनुसार महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांनी दिल्लीवारी केली आहे.

दिल्लीवारी करुन अजित पवार यांनी भाजप पक्षश्रेष्ठी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांची नाराजी व मुख्यमंत्री ठरत नसताना अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतली आहे.

निकाल लागल्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले होते. तर मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असे देखील जाहीर केले होते. महायुतीमध्ये सामील होताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी होती.

छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी, आदिती तटकरेंकडे महिला आणि बाल कल्याण, अनिल पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन आणि संजय बनसोडे यांच्याकडे युवक, क्रीडा आणि बंदरे विकास अशी खाती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार यांची अमित शाह यांच्याशी भेट घेतली आहे. त्यामुळे आता नवीन सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

हेही वाचा :

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

 AI सांगणार मृत्यूची तारीख आणि वेळ? तंत्रज्ञान करणार भविष्यवाणी