परळीच्या लेंडेवाडी गावात भीषण पाणीटंचाई
परळी तालुक्यातील लेंडेवाडी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना जीवनमरणाची लढाई करावी लागत असल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी डोंगर पार करून दरीच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरून घागरी घेऊन ये जा करावी लागत आहे. पाय घसरला तर दरीत पडून मरण्याची वेळ घोटभर पाण्यासाठी या नागरिकांवर आली आहे. याबाबत पंचायत समितीकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप या गावाला पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले नसल्याची खंत या गावचे सरपंच व गावकरी व्यक्त करत आहेत.
परळी तालुक्यातील लेडेवाडी हे एक छोटंसं गाव आहे. गावाला दोन महिन्यापासून पाण्याची कसलीही सोय नाही. गावाच्या शिवारा शेजारी असलेले अंबलटेक व चांदापूर चे तळे आटले असून या गावच्या ग्रामस्थांना कसरत करत आटलेल्या तळ्यात असलेल्या एका विहिरीत उतरुन तांब्या ने पाणी घागरीत भरून आणावे लागत आहे.मागील दोन महिन्यांपासून ग्रामस्थ पंचायत समिती मध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा करत असून प्रशासन या गावाच्या पाणी प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतांना दिसत आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देत पाणी टँकर द्वारे गावास पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
प्रशासन उदासीन
लेंडेवाडी गावकऱ्यांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर पार करावा लागतो. दरीच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरून वयोवृद्ध, लहान मुले यांना ये जा करावी लागत आहे. पाण्याच्या घागरी घेऊन जाता येता पाय घसरला तर दरीत पडून मरण्याची मोठी भीती आहे. लेंडेवाडी ता. परळी गावच्या नागरिकांचा गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनासमोर आर्त टाहो सुरु आहे.मात्र अद्यापही प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.