मोठा घोटाळा ! कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार

वारणानगर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता.पन्हाळा) शाखेत पे स्लीपवर तसेच धनादेशाद्वारे बोगस व खोट्या सह्या करून तसेच खातेदारांचे नावे बनावट खाती उघडून 3 कोटी 21 लाख 91 हजार 619 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार(scam) समोर आला.

याप्रकरणी शाखाधिकारी, कॅशियर, क्लार्क अशा पाच जणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यात एका महिलेसह चौघांना अटकही करण्यात आली. मात्र, शाखाधिकारी फरार झाला आहे. या आर्थिक घोटाळ्याने(scam) सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर (रा. कुरुकली, ता. कागल जि.कोल्हापूर) यांनी कोडोली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२९) फिर्याद नोंदवली आहे. १५ जुलै २०२१ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये कार्यरत असणारे वारणा शाखेचे शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार (रा.कळे ता. पन्हाळा), क्लार्क मुकेश विलास पाटील (रा. मसूद माले ता. पन्हाळा) कॅशियर शिवाजी शहाजी पाटील (रा.आरळे ता.पन्हाळा), मिनाक्षी भगवान कांबळे (रा.कोडोली ता. पन्हाळा), शरीफ मुन्तांज मुल्ला (रा.कोडोली ता.पन्हाळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शाखाधिकारी वगळता चौघांना अटक केली आहे.

आरोपींनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक, विश्वासघात करुन पे-स्लीपवर, धनादेशावर खोट्या व बोगस सह्या करुन तसेच खातेदारांच्या नावे बोगस खाती उघडून त्यातून रकमा काढून घेतल्या(scam). तसेच बंद खात्यावरील रकमा काढून घेऊन कर्मचाऱ्यांचा युजर आयडी, पासवर्ड वापरुन तसेच आर्थिक व्यवहारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे, केवायसी तपासणी दरम्यान वरील आरोपींना मागणी करुन देखील न देता रक्कम ३ कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा इतक्या रकमेचा अपहार केला. या सर्वांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, वारणानगर शाखेची फसवणूक केली म्हणून बँकेतर्फे फिर्याद नोंदवली आहे.

आरोपी शाखाधिकारी तानाजी पोवार याचा पोलीसांनी शोध सुरु केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधिक्षक सुवर्णा पत्की, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग तपास करत आहेत.

हेही वाचा :

खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!

तरुणीला ट्रकने चिरडले, ओव्हरटेक करण्याच्या नादात गेला जीव! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

2100 नाहीत फक्त 500 रुपयेच मिळणार, ‘या’ लाडक्या बहिणींना सरकारचा झटका