प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, बाथरूममध्ये आढळला पतीचा मृतदेह – News18 लोकमत

lमुंबई, 25 मार्च- लोकप्रिय टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री नीलू कोहलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे पती हरमिंदर सिंग कोहली यांचं निधन झालं आहे. ही घटना काल दुपारी घडली असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते पूर्णपणे ठीक होते. पण गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर दुपारी घराच्या बाथरुममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूवेळी त्यांच्या घरी फक्त एक मदतनीस हजर होती. गुरुद्वारातून आल्यानंतर हरमिंदर सिंग हे बाथरुममध्ये गेले होते. जेव्हा ते बराच वेळ बाहेर आले नाहीत, तेव्हा घरातील मदतनीस त्यांना शोधू लागली. दरम्यान बाथरुममध्ये पाहिलं असता ते खाली जमिनीवर पडलेले दिसून आले. रुग्णालयात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
नीलू कोहली यांची मुलगी साहिबा हिने ETimes ला दिलेल्या माहितीनुसार, तिने वडिलांच्या निधनाची पुष्टी करत म्हटलं आहे, “हो, हे खरं आहे. हा प्रकार आज (24 मार्च) दुपारी घडला आहे. बाबांचं अचानक निधन झालं. माझा भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे आता दोन दिवसांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. आम्ही त्याची वाट पाहात आहोत. या घटनेमुळे माझ्या आईची प्रकृती ठीक नाहीय. हे जेव्हा घडलं तेव्हा ती काही कामानिमित्त बाहेर गेली होती.
दरम्यान अभिनेत्री नीलू यांच्या मैत्रिण वंदना यांनी नवभारत टाईम्सला सांगितलं की, हरमिंदर पूर्णपणे बरे होते आणि आज दुपारी त्यांनी गुरुद्वारालाही भेट दिली होती. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. मदतनीस स्वयंपाकघरात जेवण बनवत होती.हरमिंदर बाथरुममध्ये तिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यांनी बोलताना असंही सांगितलं की, हरमिंदर यांना डायबेटीस होती पण ते ठीक होते.
नीलू कोहली या टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी दोन्ही क्षेत्रात बरंच नाव कमावलं आहे.नीलू कोहली यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात ‘दिल क्या करे’ या बॉलिवूड चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या नुकतंच ‘जोगी’ या पिरियड ड्रामामध्ये दिसल्या होत्या. याशिवाय त्यांनी नुकतंच ‘ये झुकी झुकी सी नजर’ या टीव्ही शोमध्येसुद्धा काम केलं आहे.
काही दिवसांपूर्वी कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या ‘युनायटेड कच्छे’ या नवीन प्रोजेक्टचा ट्रेलर लाँच करण्यात आला ज्यामध्ये नीलू सुनीलच्या आईच्या भूमिकेत दिसून आल्या आहेत. नीलू कोहली यांनी ‘संगम’, ‘मेरे अंगने में’, ‘छोटी सरदारनी’, ‘मॅडम सर’, ‘जमाई राजा’ यांसारख्या टीव्ही मालिकांध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी ‘हाऊसफुल 2’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘पटियाला हाउस’ सारख्या हिट सिनेमांमध्येही काम केलं आहे. परंतु छोट्या पडद्यामुळे त्यांना खास ओळख मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.