पोस्ट ऑफिसमध्ये(post office) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. आता घरबसल्या काही मिनिटांत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे मिळणार आहेत आणि यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते, आरडी खाते किंवा एफडी खाते असणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला आता घरबसल्या आपल्या खात्यावरील व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

टपाल विभागाने पोस्ट ऑफिसच्या(post office) इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे पोस्ट ऑफिस बचत बँक खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल किंवा तुम्ही मुदत ठेव (एफडी) केली असेल, तर आता तुम्हाला व्याज प्रमाणपत्रासाठी पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत जाण्याची गरज नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय खूपच फायदेशीर ठरणार आहे, कारण त्यांना अनेकदा बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाणे त्रासदायक ठरू शकते. आयकर भरताना तुम्हाला या प्रमाणपत्राची आवश्यकता भासते.
व्याज प्रमाणपत्र आवश्यक का आहे, याबद्दल पोस्ट(post office) विभागाने ७ मे २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी, ई-बँकिंग पोर्टलद्वारे व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हे प्रमाणपत्र केवळ कर भरण्यासाठीच नव्हे, तर क्रॉस चेकिंगसाठी देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला योग्य व्याज मिळत आहे की नाही, हे तपासण्यासाठी याची आवश्यकता असते. ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी देखील व्याज प्रमाणपत्र आवश्यक आहे, कारण या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना टीडीएस कपात टाळण्यासाठी फॉर्म १५ जी/फॉर्म १५ एच भरावा लागतो.

आता घरी बसून व्याज प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे, याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. सर्वात प्रथम ebanking.indiapost.gov.in या वेबसाइटवर जा. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली असेल, तर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर तुम्ही नवीन असाल, तर तुम्हाला प्रथम साइन अप करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, अकाउंट्स टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इंटरेस्ट सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठी व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे, ते वर्ष निवडावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचे व्याज प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या अनेक आकर्षक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक केल्यास ग्राहकांना चांगला परतावा मिळतो. ग्राहकांच्या गुंतवणुकीवर चांगला आणि सुरक्षित परतावा मिळत असल्याने, अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. आता व्याज प्रमाणपत्र घरबसल्या मिळण्याची सोय झाल्यामुळे, पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना अधिक सुविधा मिळणार आहे.
हेही वाचा :
प्रेम की अश्लील चाळे, धावत्या वाहनात जोडप्याने मर्यादा ओलांडल्या