ओवेसी हे घेणार आज संभाजीनगरात बैठका

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी हे आज शहरात बैठका घेणार आहेत. गेल्या महिन्याभरात ते चौथ्यांदा संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करत आहे. एकीकडे वंचितने दिलेला उमेदवार मुस्लिम समुदायातील असल्याने जलील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जलील यांच्यासाठी डोकेदुखी ठरते की काय हे पाहणे तितकच महत्त्वाच ठरणार आहे. त्यामुळे एमआयएमला संभाजीनगर लोकसभेची जागा टिकवणं हे मोठं आव्हान असणार असल्याची चर्चा आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरची लोकसभा जागा मागील काही दिवसांत चर्चेत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील एकमेव एमआयएमचा खासदार म्हणजेच इम्तियाज जलील याच मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा जलील यांच्या विजयासाठी आता स्वतः असदुद्दीन ओवेसी मैदानात उतरले आहे. आज ओवेसी संभाजीनगर शहरात अनेक ठिकाणी बैठका घेणार आहेत. शहरात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असल्याने ओवेसी यांच्याकडून अनेक भागात भेठीगाठी देखील घेतल्या जाण्याची शक्यता आहे. 

ग्रामीण भागाचाही दौरा करणार….

यंदाची लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील यांच्यासह ओवेसी यांच्यासाठी महत्वाची असणार आहे. मागील वेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याने जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जलील यांच्या विरोधात मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत शहरात सर्वाधिक लक्ष देणारे ओवेसी आता ग्रामीण भागाचा देखील दौरा करणार आहेत. आजच्या दौऱ्यात देखील ते ग्रामीण भागात नागरिकांच्या भेठीगाठी घेण्याची शक्यता आहे. 

महायुतीचा उमेदवार ठरेना!

एकीकडे महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे आणि एमआयएमने इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची घोषणा केली असतानाच, दुसरीकडे महायुतीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजप आणि शिंदेसेना यांच्यात संभाजीनगरच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असून, त्यामुळे तिढा सुटत नसल्याची माहिती मिळत आहे. महायुतीकडून अनेकजण इच्छुक असून, ज्यात भागवत कराड, अतुल सावे, विनोद पाटील, संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे महायुतीकडून कुणाला उमेदवारी जाहीर होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.