चित्रा वाघ यांचा आता थेट शरद पवारांवरच निशाणा
पुरोगामी नेते म्हणून ओळखले जाणारे, आतापर्यंत मुलगा आणि मुलगीमध्ये भेद न करणाऱ्या शरद पवारांनी आता मुलगी आणि सूनेमध्ये फरक केला, हे दुर्दैवी असल्याची टीका भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी केला. काहीही झालं तरी बारामतीचा निकाल सूनेच्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांना उत्तर देताना शरद पवारांनी मत पवारांनाच द्या, पण मूळच्या पवारांना द्या असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यावर चित्रा वाघ यांनी टीका केली. या आधी चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती, आता थेट शरद पवारांवरच टीका केल्याचं दिसतंय.
आतापर्यंत तुम्ही पवारांनाच मतदान केला, आताही जिथे पवार नाव दिसेल त्याच ठिकाणी मतदान करा असं म्हणत सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं होतं. त्यावर शरद पवारांनी उत्तर देताना पवारांनाच मत द्या हे बरोबर आहे, पण मूळच्या पवारांनाच मत द्या, बाहेरून आलेल्यांना नका देऊ असं म्हटलं होतं.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “कधीच मुलगी आणि मुलगा यांच्यात फरक न करणारे पवार साहेब यांनी आता मुलगी आणि सूनेत फरक केला. जी सून 40 वर्षांपासून पवारांच्या घरी वावरते ती आता परक्यांची आहे, पवारांची नाही असं ते म्हणाले. 40 वर्षे पवारांच्या घरात नांदणारी मराठवाड्यातील पाटलांची लेक ही पवार साहेबांना आपली वाटत नाही, परकी वाटते याच्यापेक्षा दुर्दैव ते काय? पण काहीही होवो, बारामतीचा निकाल हा पवारांच्या सुनेच्याच बाजूने लागणार.
काय म्हणाले होते अजित पवार?
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांनाच मतदान केलं होतं. यावेळीही तेच करायचं आहे. आतापर्यंत वडिलांना म्हणजे पवारसाहेबांना, मुलाला म्हणजे मला, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सुनेला मतदान करायचं आहे.
ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल त्या ठिकाणी मतदान करायचं, म्हणजे तुम्हाला पवारांनाच मतदान केल्याचं समाधान मिळेल असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
शरद पवारांचं प्रत्युत्तर
पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचं मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला होता.