पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले;
पोर्श(porshe) ही अलिशान कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मद्यपी मुलाने दोन तरुणांना चिरडलं. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपलं गेल्याचा आरोप केला जातो. पुण्यातील कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. आता त्यांनी याप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकंच नाही तर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात पैसे खाल्ले आहेत असाही आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.
अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात
कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे आदेश बुधवारी रात्री दिले.बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे, के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास बाल न्याय मंडळाने निकाल दिला. त्यानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
नेमकी काय घटना घडली?
मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अनिश आणि अश्विनी यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर त्याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी पोलीस आम्हाला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. तर अनिशच्या आईने माझ्या मुलाची हत्या केली असं म्हटलं आहे. तर रवींद्र धंगेकरांनी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला आहे.
रवींद्र धंगेकरांनी काय म्हटलं आहे?
“ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी केली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते. आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिशनर यांच्यापासून करायला हवी”, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
रवींद्र धंगेकरांचा आरोप पोलीस आयुक्तांवर आरोप काय?
“पुणे पोलीस आयुक्तांनी पोर्श अपघात प्रकरणात पैसे खाल्ले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी त्रुटी केल्या आहेत. या सगळ्या प्रकरणाचा तपास वेगळ्या संस्थेकडे दिला पाहिजे. यामध्ये डिलिंग कुणी केलं? कुठल्या हॉटेलमध्ये झालं? पोलीस आयुक्तांना कसं पाकिट गेलं? याचा तपास झाला पाहिजे. पोलीस आयुक्तांशिवाय हे घडूच शकत नाही. पोर्शच्या धडकेत एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवागारात होते आणि त्यांना धडक देणारा मुलगा आणि त्याचा बाप दोघेही घरी जाऊन आराम करत होते. ही कुठली नीतीमत्ता आहे? पैसे खाल्ल्याशिवाय हे होऊच शकत नाही. आता मी रस्त्यावर येऊन या प्रकरणी वाचा फोडणार” असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
एकच आश्वासन देत दोन्ही पत्नींना पटवलं, YouTuber Armaan Malikची पोलखोल
लाईव्ह सामन्यात शाहरुख खानकडून मोठी चूक! मागावी लागली माफी
आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही