शिंदे नको-नको म्हणतायत, पण भाजपला त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद का द्यायचंय
मुंबई : सत्तास्थापनेसाठी महायुतीचे(political updates) नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल रात्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीसांच्या खांद्यावर पुन्हा मुख्यमंत्रिपदाची झूल टाकण्याची तयारी भाजपश्रेष्ठींनी सुरु केली आहे. कारण मोदी-शहा मुख्यमंत्रिपदासाठी मराठा चेहऱ्याच्या शोधात असतानाच संघाच्या दबावामुळे फडणवीसांचे पारडे जड झाले. मात्र त्याच वेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खांद्यावर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा येऊ नये, या ‘काळजी’त आहेत. यामागे अनेक कारणं दडलेली आहेत.
एकनाथ शिंदे(political updates)यांच्या मनाची द्विधा अवस्था बैठकीतून बाहेर आलेल्या छायाचित्रांमध्ये नेमकेपणाने टिपलेली आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद घेण्याबाबत शिंदेंच्या मनात चलबिचल आहे. शिंदेंनी आधीच भाजपश्रेष्ठींचा जो निर्णय असेल, तो मान्य करत सीएम पदाच्या शर्यतीतून अप्रत्यक्ष माघार घेतली आहे. मात्र शिवसेनेतील नेत्यांनी शिंदेंकडे उपमुख्यमंत्रिपद तरी स्वीकारण्याचा धोशा लावला आहे.
दुसरीकडे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणीही होत आहे. परंतु त्यास भाजप नेतृत्व तयार नाही. खासदार शिंदेंना विधानपरिषदेवर पाठवून मुख्यमंत्री बनवणं अवघड नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देत महायुतीचे महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन हा समानतेचा संदेश भाजपला द्यायचा आहे.
एक म्हणजे श्रीकांत शिंदे हे फडणवीस आणि अजित पवार यांच्या तोडीस तोड नसतील. कारण त्यांना राज्यशकट चालवण्याचा अनुभव नाही. दुसरं, त्यांनी वयाला साजेसा आक्रमक बाणा घेतल्यास निर्णयप्रक्रियेत खटके उडण्याची शक्यता अधिक आहे. तिसरं, श्रीकांत शिंदेंकडे धुरा दिल्यास घराणेशाहीच्या मुद्द्याचे आयते कोलीत विरोधकांच्या हाती जाईल.
एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याने भाजपची अजित दादांवरील भिस्त कमी होण्यास मदत होईल. मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रिपद भूषवल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं उत्तम उदाहरण शिंदेंसमोर ठेवण्यात आलं आहे. पवार आणि शिंदे हे दोन मराठा चेहरे असल्यामुळे समतोल राखण्यास मदत होणार आहे.
भाजपला स्पष्ट बहुमत नसलं, तरी एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करणं त्यांना तितकं अवघडही नव्हतं. तिथेच शिंदेंची बार्गेनिंग पॉवर घटली. अजित पवार यांनी आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांची कोंडी केली. पाठोपाठ रिपाइंनेही त्यांच्या नावाचा सूर आळवला. एकामागून एक मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवत फडणवीसांनी आपलं वजन वाढवून घेतलं.
मुख्यमंत्रीपद सोडतानाच एकनाथ शिंदे यांनी गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासारख्या भारदस्त खात्यांची मागणी केली आहे. यापैकी गृह खातं फडणवीस सोडण्याची शक्यता कमीच. तर अर्थ मंत्रालयावरही अजितदादांनी आपला दावा उघड सांगितला आहे. त्यामुळे शिंदेंना नगरविकास, पीडब्ल्यूडीवर समाधान मानावे लागेल.
हेही वाचा :
चाहत पांडेसोबत रजत दलालचा रोमँटिक डान्स, चाहते थक्क Video
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF चे पैसे काढणं होणार सोप्पं
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार