ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला सर्वात मोठा इशारा;

सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेस(Congress) आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा खडाजंगी सुरु झाली आहे. बंडखोरीनंतरही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनी उपस्थिती लावली आहे. यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनादेखील आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस विशाल पाटील यांच्या मागे आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी केलाय. “काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काल घेतलेलं स्नेहभोजन हे गद्दारीचा अधिकृत पुरावा आहे. त्यामुळे आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे की, पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा. आपण विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही. याचा अर्थ असा समजायचा का की गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस विशाल पाटील यांच्या पाठीमागे उभी होती?”, असं संजय विभूते म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे संजय विभूते नेमकं काय म्हणाले?

“गेल्या दोन दिवसांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी अधिकृत पत्र काढून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह सर्वांनी एकत्र यावं. आपण निवडणुकीच्या काळात केलेलं काम, यासाठी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद आणि आनंद घ्यावा. परत एकदा नव्या उमेदीने, विधानसभेसाठी नव्याने काम करण्याची सूचना देण्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरंतर आम्ही सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की, महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांपैकी सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ होता ज्याठिकाणी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून गद्दारी केली”, अशी टीका संजय विभूते यांनी केली.

“याबाबतीत आम्ही सातत्याने सांगत होतो. याबाबतीत आम्ही सातत्याने वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो. राष्ट्रवादीनेदेखील आम्हाला सुरुवातीला या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली. पण शेवट काय झाला हे आपण सर्वांनी पाहिलं असेल. सुरुवातीला जवळपास 70 टक्के राष्ट्रवादी ही विशाल पाटील यांच्यासोबत गेली. खरंतर वाद हा शिवसेना आणि काँग्रेसचा होता. पण राष्ट्रवादी का गेली? हा आमच्यापुढचा प्रश्न होता. उर्वरित राष्ट्रवादीने उघडपणे भाजपचं काम केलं”, असा आरोप संजय विभूते यांनी केला.

‘काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करा’

“काल दिलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने घेतलं, याचाच अर्थ असा की, त्यांनी अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा दिला आहे. माझी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे की, पहिल्यांदा आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी. आपण विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही. याचा अर्थ असा समजायचा का की गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस विशाल पाटील यांच्यासोबत होती?”, असा सवाल संजय विभूते यांनी केला.

‘सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर…’

“हे आम्ही म्हणत नाहीत. तर तुमच्या जिल्हाध्यक्षांच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील येतात, याचाच अर्थ असा की, आपण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात लोकसभेला अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा देत आहेत. काँग्रेसला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीने विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी. अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही”, असा मोठा इशारा संजय विभूते यांनी दिला.

“आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना आम्ही सांगितलं आहे की, आपण महाराष्ट्रात काहीही करा. पण सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी होणार नाही. एकवेळ पक्षाने आमची हकालपट्टी केली तरी चालेल. पण काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेत विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही ही शपथ सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी घेतली आहे”, असं संजय विभूते म्हणाले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचं स्पष्टीकरण काय?

ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. “निवडणुकीनंतर हे स्नेहभोजन झालेलं आहे. खरं म्हणजे ज्यांना दीर्घ पल्ल्याचं राजकारण करायचं आहे, त्यांनी एका निवडणुकीवरुन असं भाष्य करणं योग्य वाटत नाही. अनेक निवडणुका पुढे आहेत. महाविकास आघाडी राज्यात भक्कम झालेली आहे. पुन्हा आम्ही एकत्रित निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे त्यांची काही तक्रार असेल तर बंद खोलीत त्यांच्या वरिष्ठांकडे करावी. आमचे वरिष्ठ आणि त्यांचे वरिष्ठ एकत्र बसतील. या संदर्भात निर्णय घेतील”, असं पृथ्वीराज पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा :

तुमच्या ‘या’ सवयीमुळे मानेवर येऊ शकतो २७ किलोचा भार;

ओबीसी आरक्षण रद्द, मुख्यमंत्री आक्रमक, म्हणाले… निर्णय स्वीकारणार नाही…

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ले;