आपण सर्व जण दिवसभर विचारांच्या गर्दीत वावरत असतो. डोळे उघडताच सुरू होणाऱ्या विचारांची रेलचेल रात्री डोळे मिटेपर्यंत सुरूच असते.

आपण सर्व जण दिवसभर विचारांच्या गर्दीत वावरत असतो. डोळे उघडताच सुरू होणाऱ्या (starts)विचारांची रेलचेल रात्री डोळे मिटेपर्यंत सुरूच असते. ‘आज काय करायचं?’, ‘काल मी ते का केलं?’, ‘उद्या काय होईल?’, ‘लोक काय म्हणतील?’ असे असंख्य विचार आपल्या मनात पार्श्वभूमीवर सतत चालू असतात.

आपले विचार आपल्याला जगण्याची दिशा देतात, निर्णय घेण्यास मदत करतात; पण ते अविरत, अनियंत्रित आणि अतीव होतात, तेव्हा ते आपल्या अंतर्गत शांततेचा आवाज दडपतात. मन जणू एक अविरत चालणारं रेडिओ स्टेशन होऊन बसतं. सतत काही ना काही त्या रेडिओवर चालू असतं.

आपलं मन निसर्गतःच विचार करतं; पण जेव्हा विचार थांबत नाहीत, ते आपल्या लक्षात येण्याआधीच (starts)वेगात बदलत राहतात, तेव्हा आपण विचारांच्या अधीन होतो. मग नकळत ते आपल्या मनावर ताबा घेतात आणि आपल्या मनाला, मूडला आपल्या मनःस्थितीला कंट्रोल करतात. मात्र, हे गणित उलटं असायला हवं. आपल्या विचारांवर आपल्या मनाचा आणि आपल्या विवेक बुद्धीच्या कंट्रोल पाहिजे.

अविरत आणि अनियंत्रित विचारांचा आवाज म्हणजे गोंगाट असतो, त्यात स्पष्टता, शांतता आणि समाधान नसतं. बऱ्याच वेळेला त्यात भीतीचा सूर असतो, ताण असतो, आणि अनेकदा स्व-शंका आणि अपराधीपणाचा नाद असतो, अपेक्षांचा ओझं असतं. या विचारांचा जो आवाज असतो तो शांततेच्या विरुद्ध असतो आणि आपल्या विचारांवर आपला कंट्रोल असण्यासाठी आपली आतील शांतता आवश्यक असते.

शांतता म्हणजे विचार नसणं नाही. शांतता म्हणजे विचार असतानाही त्यांना जागरूकपणे पाहता येणं. ती एक आतली जागरूकता असते, जिथे आपण विचारांच्या वर असतो, त्यांचं निरीक्षण करत असतो; पण त्यात हरवत नाही. हा अनुभव आपल्या सर्वांना कधी ना कधी आलेला असतो. निसर्गात फिरताना, संगीतात गुंग होताना, ध्यान करताना किंवा अगदी खोल श्वास घेताना. त्या क्षणात विचार थोडावेळ थांबतात आणि एक खोल, सुंदर शांतता आपल्याला अनुभवायला मिळते.

विचारांच्या आवाजातून शांततेकडे
विचारांचं निरीक्षण करा, त्यांच्याशी एकरूप होऊ नका : ‘हे माझे विचार आहेत; पण मी ते नाही’ (starts)ही जाणीव जागृत झाली, की आपण विचारांच्या वर उठतो. दररोज काही वेळ विचारांना फक्त ‘पाहण्याचा’ सराव करा.

विचार जणू आकाशात येणाऱ्या ढगांसारखे असतात, ते फार वेळ थांबत नाहीत; पण आपणच त्यांना खूप seriously घेत असतो. आपण युट्यूब बघताना जसं जाहिराती स्किप करत असतो, तसेच आपल्या विचारांनाही स्किप करता यायला हवं. कारण मनात येणार प्रत्येक विचार हा अचूक नसतो, किंवा महत्त्वाचा नसतो.

श्वासाकडे लक्ष द्या : आपले विचार जास्त करून भूतकाळात असतात, किंवा भविष्यात असतात. ते क्वचितच आपल्याला आत्ताच्या या क्षणात रमू देतात. श्वास हा आपल्याला, आपल्या मनाला ‘आत्ता’त आणणारा सेतू आहे. मन भरकटतं, तेव्हा डोळे मिटून केवळ श्वासाकडे लक्ष देणं – ही शांततेकडे परतीची वाट आहे.

लेखनाचा आधार घ्या : शक्य असेल, आवड असेल तर अधूनमधून थोडं विचारमंथन कागदावर उतरवा. लिहिताना विचारांना शब्दरूप मिळतं, आणि त्या विचारांचं आपल्यावरच नियंत्रण कमी होतं. ‘आज माझ्या मनात काय आहे?’ असा एक सोपा प्रश्न आणि त्यावर मोकळं लेखन – हे अत्यंत शक्तिशाली साधन ठरू शकतं.

निसर्गात वेळ घालवा : निसर्गात असताना आपल्या विचारांची गती मंदावते. झाडांच्या सावलीत, पावसाच्या टपटप आवाजात, पक्ष्यांच्या आवाजात एक सहज शांतता असते, जी आपल्यातसुद्धा जाणवते. निसर्गातले आवाज हे आपल्या विचारांच्या आवाजाच्या अगदी उलट असतात. विचारांच्या आवाजाचा गोंगाट असतो, तर निसर्गाच्या आवाजामध्ये ‘सुकून’ असतो, शांतता असते, प्रसन्नता असते.

डिजिटल डिटॉक्स करा : सततची नोटिफिकेशन्स, स्क्रोलिंग आणि माहितीचा भडिमार हे सर्व अतिविचारांमध्ये भर घालतात. दररोज काही वेळ ‘डिजिटल शांतता’ अनुभवणं गरजेचं आहे.

आजचं युग म्हणजे माहितीचा आणि विचारांचा स्फोट. आपण सतत काहीतरी consume करत राहतो. वाचतो, ऐकतो, बोलतो, विचार करतो; पण आतल्या शांततेशी नातं ठेवण्यासाठी थोडा वेळ काहीही न करता बसणं, फक्त स्वतःबरोबर असणं – हीच खरी मनाची जागरूकता आहे. शांत मन म्हणजेच स्पष्ट मन. आणि स्पष्ट मनच आयुष्याशी नातं प्रामाणिकपणे जोडू शकतं.

शांतता आपोआप येत नाही. ती तयार करावी लागते. जसा संगीताचा अर्थ सुरांच्या मधल्या ‘शांत’ जागेत असतो, तसा आयुष्याचा अर्थही आपल्यातल्या आतल्या शांततेत दडलेला असतो. म्हणून ‘मानस भान’ ठेवून आपण सगळेच या विचारांचा आवाज थोडा कमी करून, अंतर्गत शांततेला देखील ऐकण्याचा सराव करूया.

हेही वाचा :