अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस परिसरात ढगफुटीसदृश पाऊस(Heavy rain) झाला. यामुळे पारस गावाला नदीचे रूप आले. दरम्यान, पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांना जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
संपूर्ण राज्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस(Heavy rain) होताना दिसत आहे. तर आता हवामान खात्यानेच आणखी काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने कोकण किनारपट्टीसह पुणे सांगली, सातारा व मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातही जोरधारा सुरूच आहेत.
अकोल्यात झालेल्या पावसात लोकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. तसेच पुराच्या पाण्यात मोटारसायकलसह तरुण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उबारखेड गावात घडली आहे. जिल्ह्यातील पाच-सहा गावांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. बाळापुरचे तहसीलदार पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तेल्हारा तालुक्यामध्ये पंचगव्हाण मंडळातील उबारखेड येथील मनोज नामदेव गवारगुरु व त्यांचा मुलगा वैभव मनोज गवारगुर हे दोघे सोमवारी रात्री ९ च्या सुमारास शेतातून मोटरसायकलने घरी जात होते. यावेळी पंचगव्हाण ते निंभोरा बु. मधात फरशीवरील नाल्याला पूर आल्याने त्यांनी पुरातून दुचाकी टाकली. यात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली असून, यात वैभव गवारगुर याचा मृत्यू झाला.
अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तळ कोकणासह मुंबई व उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचे अलर्ट देण्यात आला.
हेही वाचा :