महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.(politics)यानंतर आता संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.या व्हिडीओत संजय शिरसाट हे आपल्या बेडरूममध्ये बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला एका बॅगेत नोटांचे बंडल स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडीओत संजय शिरसाट हे सिगारेट पिताना आणि फोनवर बोलतानाही दिसत आहेत. त्यासोबतच या व्हिडीओत त्यांचा पाळीव कुत्राही फिरताना दिसत आहे. सध्या संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खासदार संजय राऊत यांनी या व्हिडीओवरुन शिंदे गटावर टीका केली आहे.(politics)आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला होता. माझ्याकडे असलेल्या व्हिडीओत संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत हे दिसत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले होते. या व्हिडीओमुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय शिरसाट यांना नुकतंच आयकर खात्याने नोटीस बजावली आहे.(politics)छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात झालेल्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरुन शिरसाट यांना नोटीस देण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र पहिल्यांदाच सत्ताधारी मंत्र्याला आयकर विभागाची नोटीस आल्याने चर्चा रंगली आहे. सध्या महायुतीत अतंर्गत वाद समोर येत आहेत. त्यातच आता संजय शिरसाट यांना आलेल्या आयकर विभागाने नोटीस पाठवल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता संजय शिसराट यांचा नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता आयकर विभाग संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान हा व्हिडीओ समोर येताच संजय शिरसाट यांच्याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. पैशांनी भरलेली बॅग नेमकी कुठून आली? संजय शिरसाट यांच्याकडे पैसे कुठून आले? असा सवालही केला जात आहे. यावरच आता समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ती बॅक पैशांनी भरलेली नाही. तिच्यात कपडे आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
हेही वाचा :