डिझाइन क्षेत्र : सर्जनशीलतेकडून करिअरकडे

डिझाईन हे केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि (painting)तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. आजच्या युगात डिझाइन हे ‘आर्ट’पेक्षा अधिक ‘सायन्स’ झाले आहे. ‘बॅचलर ऑफ डिझाइन हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम हे क्षेत्र करिअरसाठी निवडणाऱ्या सर्जनशील विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो.

बी.डिझाइनसाठी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतो. काही संस्थांमध्ये बोर्डामध्ये किमान ५० टक्के गुणांची अट लागू असते, तर ‘आयआयटी’साठी ७५ टक्के गुण २०२४ पर्यंत आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी आठवी ते दहावी दरम्यान एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा दिल्या असतील, (painting)तर त्यांना डिझाइन कोर्सचे आकलन अधिक सुलभ होते.

या क्षेत्रासाठी सर्जनशीलता, कल्पकता, रंगसंगतीचं ज्ञान, निरीक्षणशक्ती, डिजिटल सॉफ्टवेअर हाताळण्याचे कौशल्य, संवादकौशल्य, टीमवर्क आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता आवश्यक असते. हा कोर्ससुद्धा इंजिनिअरिंगसारखाच प्रोफेशनल आहे.

प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा

या कोर्समध्ये प्रवेशासाठी देशभरात काही प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि खासगी संस्था विविध प्रवेश (painting)परीक्षा घेतात. मुख्य परीक्षा म्हणजे —

१) UCEED

२) NID

३) NIFT

४) MAH-B.Design CET

५) AIEED, UID-DAT, BITS-DAT, MIT-WPU DAT, MITID-DAT, निरमा, अनंत इत्यादी खासगी संस्थांच्या स्वतंत्र प्रवेश परीक्षाही घेतल्या जातात.

या परीक्षांमध्ये स्केचिंग, सर्जनशील विचार, नावीन्यता, कलात्मकता, निरीक्षणशक्ती, सौंदर्यदृष्टी, पर्यावरणीय जाणिवा, विश्लेषणात्मक विचार, तार्किक कौशल्ये (रिझनिंग), कल्पनाशक्ती, डोळ्यांपुढे चित्र तयार करता येणे, समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासले जाते. काही ठिकाणी पोर्टफोलिओ सादरीकरण, स्टुडिओ टेस्ट व मुलाखतीनंतर मेरिट लिस्ट तयार केली जाते.

डिझाइनच्या प्रमुख शाखा

डिझाइन क्षेत्रात खालीलप्रमाणे विविध शाखा उपलब्ध आहेत –

प्रॉडक्ट डिझाइन : उपयुक्त वस्तूंचे रचनात्मक डिझाइन

फॅशन व लाइफस्टाइल डिझाइन : कपडे, दागिने, अ‍ॅक्सेसरीज

ग्राफिक व कम्युनिकेशन डिझाइन : लोगो, जाहिरात, ब्रँडिंग

इंटिरिअर डिझाइन : वास्तूंची सौंदर्यपूर्ण रचना

यूजर इंटरफेस/यूजर एक्सपिरियन्स डिझाइन : मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट्स

अ‍ॅनिमेशन व फिल्म डिझाइन : डिजिटल मीडियासाठी कंटेंट निर्मिती

ऑटोमोबाइल व ट्रान्सपोर्ट डिझाइन : वाहने व वाहतूक व्यवस्था

करिअर व संधी

बी. डिझाइन ही पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी व खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी मिळतात. प्रॉडक्ट डिझायनर, फॅशन डिझायनर, ग्राफिक डिझायनर, इंटिरिअर डिझायनर, युआय/युएक्स डिझायनर, अ‍ॅनिमेटर, ब्रँड कन्सल्टंट, आर्ट डायरेक्टर, फ्रीलान्स डिझायनर अशा विविध भूमिका बजावता येतात.

याशिवाय, डिजिटल मीडियाची वाढती मागणी, स्टार्टअप संस्कृती आणि ग्राहककेंद्री विचारसरणीमुळे डिझायनिंग क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य आहे. ही डिग्री झाल्यानंतर मास्टर्स इन डिझाइन, एमबीए किंवा जॉब देखील करू शकतात.

निष्कर्ष
डिझाइन क्षेत्र हे कल्पक, विचारशील, सर्जनशील आणि तांत्रिक कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम करिअरचा पर्याय आहे. केवळ नोकरी मिळवण्यापुरतेच नाही, तर स्वतःचे वेगळेपण ठसवण्याचे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य या क्षेत्रात आहे. तुम्हाला चित्रकला, निरीक्षण, स्केचिंग, कल्पनाशक्ती आणि डिजिटली काम करण्याची आवड असेल, तर बी.डिझाइन हा कोर्स तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा :