कोल्हापूर: गांधीनगर येथील व्यापाऱ्याच्या टेम्पोत ठेवलेली १ कोटी ७८ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून(theft ) नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कामगिरी करत चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. या प्रकरणात चोरीच्या रक्कमेसह मोबाईल व दुचाकी असा एकूण १ कोटी ७९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
गांधीनगरमध्ये राहणारे व्यापारी प्रकाश वादवाणी यांनी आपल्या व्यवसायासाठी वापरात असलेल्या टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये रोख रक्कम ठेवली होती. १३ जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डमधील रक्कम चोरून नेली. याप्रकरणी कैलास गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आतल्या माणसाचाच हात?
प्रकाश वादवाणी यांच्याकडे नोकरी करणाऱ्या स्वरूप शेळके याला गोरड यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती. त्याने ही माहिती योगेश पडळकर, स्वयंम सावंत, सम्राट शेळके आणि एका अल्पवयीन आरोपीला दिली. सर्वांनी मिळून चोरीचा(theft ) प्लॅन आखला आणि नियोजित पद्धतीने रक्कम लंपास केली.
पोलीस तपासात उलगडा
पोलिसांनी तपास सुरू करताच लक्षतीर्थ वसाहत येथे राहणाऱ्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. योग्य वेळी सापळा रचून मुख्य आरोपी योगेश पडळकर आणि इतरांना अटक करण्यात आली. चोरीसाठी वापरलेली दोन दुचाकी, मोबाईल फोन आणि एकूण १ कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
कोल्हापूर पोलिसांनी जलद गतीने केलेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांना अटकाव घालण्यास पोलिसांनी यश मिळवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :