जगप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता(actor ) आणि “द कॉस्बी शो” मधील लोकप्रिय पात्र ‘थिओ’ साकारणारे माल्कम-जमाल वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला असून त्यांच्या अचानक जाण्याने जागतिक मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
सुट्टी दरम्यान घडला दुर्दैवी प्रकार :
माल्कम वॉर्नर हे आपल्या कुटुंबासह कोस्टा रिका येथे सुट्टीसाठी गेले होते. तेथे समुद्रात पोहत असताना तीव्र प्रवाहामुळे ते वाहून गेले, आणि त्यानंतर त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक न्याय विभागाने दिली आहे. रेड क्रॉसच्या जीवरक्षकांनी वॉर्नर यांना घटनास्थळी मृत घोषित केलं. या प्रकरणी अद्याप कुटुंबीय किंवा प्रतिनिधींनी कोणताही अधिकृत खुलासा दिलेला नाही.
“थिओ”च्या भूमिकेनं घराघरात लोकप्रियता :
1980 च्या दशकातील सुपरहिट अमेरिकन मालिका ‘The Cosby Show’ मध्ये त्यांनी साकारलेली थिओ हूक्स्टेबल ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि कौटुंबिक मालिका विश्वातील हसते-खेळते व्यक्तिमत्त्व म्हणून वॉर्नर यांना अपार लोकप्रियता मिळाली होती.
वॉर्नर यांना 2012 मध्ये “Reed Between the Lines” या मालिकेसाठी NAACP Image Award अंतर्गत सर्वोत्तम कॉमेडी अभिनेता पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर NAACP संस्थेने इन्स्टाग्रामवर त्यांचा फोटो शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली.
“NAACP इमेज अवॉर्ड विजेता अभिनेता(actor ) माल्कम-जमाल वॉर्नर यांना #RestInPower. तुमच्या प्रतिभेने आणि उत्साहाने अनेकांचे जीवन प्रभावित केलं, तुमचा वारसा प्रेरणा देत राहील.”
वॉर्नर यांचा प्रवास :
१८ ऑगस्ट १९७० रोजी जर्सी सिटी, न्यू जर्सी येथे जन्मलेले वॉर्नर हे आई पामेला यांच्यासोबत वाढले, ज्या त्यांची अभिनय व्यवस्थापक होत्या. त्यांचं नाव नागरी हक्क नेता माल्कम एक्स आणि जॅझ संगीतकार अहमद जमाल यांच्या प्रेरणेतून ठेवण्यात आलं होतं. ते अनेक अमेरिकन टीव्ही मालिकांमध्ये झळकले असून त्यांनी कॉमेडी, कौटुंबिक ड्रामा आणि सामाजिक विषयांवर आधारित अभिनयाच्या क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली होती.
हेही वाचा :