मोठी बातमी! शाळेचं छत कोसळलं, ४ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. पिपलोदी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचं(School ) छत अचानक कोसळल्यामुळे चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, ६० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातामध्ये शाळेची (School )भिंतसुद्धा कोसळली असून, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल, प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्र येत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मदतकार्य वेगाने सुरू ठेवण्यात येत आहे.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, मुसळधार पावसाचा परिणाम? :
शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण होती आणि छताच्या सिमेंटमध्ये पडलेली तडेही अनेक दिवसांपासून लक्ष वेधून घेत होते, असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंतींच्या मजबुतीवर परिणाम झाला होता, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी तात्काळ बचावकार्य सुरु करण्याचे आदेश दिले असून, जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची गंभीरता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राजकीय प्रतिक्रिया आणि प्रशासनाची जबाबदारी :
या भीषण दुर्घटनेनंतर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही प्रतिक्रिया दिली असून, “झालावाडच्या मनोहरथाना येथील एका शाळेची इमारत कोसळल्याने अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची दुःखद माहिती मिळाली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, जीवितहानी कमी व्हावी,” असे त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले.

या घटनेमुळे सरकारी इमारतींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जीर्ण झालेल्या शाळा इमारतींची वेळोवेळी दुरुस्ती केली जात नाही, यामुळेच असे अपघात घडत असल्याचे पालक व नागरिक संतप्तपणे व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :