राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने(scheme) अंतर्गत महिलांसाठी एक मोठा आर्थिक दिलासा जाहीर करण्यात आला आहे. आता मुंबईतील महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. मुंबई बँकेकडून हे कर्ज दिलं जाणार असून महिलांना उद्योजकतेकडे वळवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना छोट्या व्यवसायासाठी पूरक भांडवल उपलब्ध करून देणे हा आहे. आतापर्यंत महिलांना या योजनेंतर्गत 9 टक्के दराने कर्ज देण्यात येत होते, मात्र आता त्यात मोठा बदल करत शून्य टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.
या योजनेतून(scheme) एकट्या महिलेसह समूहातील 5 ते 10 महिलांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जात आहे. प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की, महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांचा व्यवसाय तपासला जाईल आणि मग कर्ज मंजूर होईल. विशेष म्हणजे या कर्जावरील व्याज शासनाच्या चार महामंडळांमार्फत परत दिलं जाणार आहे.
या चार महामंडळांमध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्तांसाठीचं महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा समावेश आहे. या योजनांमधून महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज परत मिळतं, त्यामुळे प्रत्यक्षात महिलांसाठी कर्ज मोफत ठरतं.
सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 12 ते 13 लाख महिला आहेत. त्यातील अनेक महिला आता शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेऊ शकतील. मुंबई बँकेच्या अंदाजानुसार, त्यांच्या बँकेकडे सुमारे 1 लाख महिला सभासद आहेत आणि त्याही या नव्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला असून, महिला आर्थिक विकासाच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा :