अनिल अंबानी यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने मोठी छापेमारी केली आहे. जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींचे बंधू आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सचे चेअरमन अनिल अंबानी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून(ED ) देशभरात तब्बल ५० ठिकाणी ही छापेमारी सुरू असून, यात अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारीही तपासाच्या रडारवर आहेत.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी; अनेक संस्थांचा तपास अहवाल आधार :
ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार करण्यात आली आहे. नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथोरिटी, तसेच बँक ऑफ बडोदा आणि सीबीआयच्या दोन FIR च्या आधारे ही छापेमारी करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजते. विशेषतः रिलायन्स होम फायनान्स लि. या कंपनीशी संबंधित व्यवहार आणि मालमत्तांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
ईडीने(ED ) अनिल अंबानींच्या कार्यालयांसह त्यांच्या कंपन्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकले आहेत. यामध्ये महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज, व्यवहार नोंदी, कॉन्ट्रॅक्ट्स व बँक व्यवहारांची झाडाझडती सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून, काहींना ताब्यात घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे.
५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे :
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई एकाचवेळी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये केली जात आहे. यामध्ये फायनान्शियल हबमध्ये असलेली व्यावसायिक कार्यालयं, बँक खाती, डिजिटल रेकॉर्ड्स आणि रिअल इस्टेट मालमत्ता यांचा समावेश आहे. ही छापेमारी ईडीसाठीही मोठी आणि व्यापक तपास मोहीम मानली जात आहे.
याआधीही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स व रिलायन्स कॅपिटल सारख्या कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या. कर्ज थकबाकी, बाजारपेठेतील पत आणि नियामक कारवायांमुळे त्यांच्यावर आर्थिक दबाव होता. ही छापेमारी त्या पार्श्वभूमीवर आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते.
हेही वाचा :