अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का यावर शरद पवार म्हणाले… 

भाजपसोबत जायचं नाही ही आपली भूमिका या आधीही होती, आणि यापुढेही राहिल असं सांगत जर कुणाला परत यायचं असेल तर इंडिया आघाडीत यावं असं शरद पवार म्हणाले. जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचं असेल तर यावं, फक्त भाजप नको अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली. या देशाची सत्ता पुन्हा भाजपकडे गेल्यास ती देशहिताची ठरणार नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो असून यावेळी लोक आम्हाला संधी देतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. शरद पवारांनी ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधताना हे वक्तव्य केलं.

ठाकरेंसोबत जाण्याचा आमचा प्लॅन
2014 असेल वा 2017 साली असेल, भाजपसोबत जायचा निर्णय हा शरद पवारांनीच घेतला होता, 2019 च्या पहाटेच्या शपथविधीसाठीही त्यांचा पाठिंबा असल्याचं याआधी अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 2014 साली भाजपला पाठिंबा द्यायचं जाहीर केलं, पण तो दिला नाही, तो स्ट्रॅटेजीचा भाग होता. मात्र 2017 साली शिवसेनेला भाजपपासून दूर करून उद्धव ठाकरेंसोबत जायचा आमचा प्लॅन होता, आणि नंतर तो यशस्वी ठरला. जे लोक आता म्हणतात की त्यावेळी भाजपसोबत जायचं ठरलं होतं, त्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं तर सत्तेसोबत जायचं होतं.

बारामतीत मी अॅक्शन घेणार
निवडणुकीमध्ये सून आपल्या विरोधात उभी राहिली, त्याचा काही त्रास नाही, लोकशाहीत तो प्रत्येकाचा अधिकार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. बारातमीत कोण निवडून येणार, काय अंदाज असेल असा प्रश्न केल्यावर शरद पवार म्हणाले की, अंदाज बिंदाज मी सांगत नसतो, मी अॅक्शन घेत असतो.

यावेळी आम्हाला संधी मिळेल
राज्यातील किती जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, आधी 50 टक्के जागा आम्हाला मिळतील असं वाटत होतं. पण सध्या त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा ट्रेन्ड दिसतोय. शेवटी लोक काय करतील यावर सगळं अवलंबून असेल.

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला एक आणि एमआयएमला एक जागा मिळाली होती. आता तशी अवस्था नाही असं शरद पवारानी सांगितलं. यावेळी भाजपविरोधी वातावरण असल्याने लोक आम्हाला संधी देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.