अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी संगीतकार ए. आर. यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे पार पडला.  

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 वा पूण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा आज 24 एप्रिलला दीनानाथ नाट्यगृह येथे पार पडला. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या 34 वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. 

उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी पुरस्कार – मोहन वाघ

मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार – अशोक सराफ

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार – पद्मिनी कोल्हापूरे

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार – रुपकुमार राठोड

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार – भाऊ तोरसेकर

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार – अतुल परचुरे

मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार – रणदीप हुडा

ज्या आकाशाची सावली मला लाभली त्या आकाशाचं नाव होतं लता दीदी : अमिताभ बच्चन

‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानंतर अमिताभ बच्चन म्हणाले,”मागील वर्षी या पुरस्काराला आलो नाही मात्र यावेळी मी आलो आहे. ⁠एका कार्यक्रमात हिंदी बोलताना मराठी बोलायची मागणी केली होती. त्यावेळी मी सांगितलं होतं की मी मराठी शिकत आहे. मात्र अद्याप मी मराठी शिकलेलो नाही. 1981 मध्ये मी न्युयॉर्कमध्ये होतो त्यावेळी लता दिदी ही त्या ठिकाणी होत्या. मला गाणं गाण्यासाठी लताजी यांनी जबरदस्ती केली. ज्या आकाशाची सावली मला लाभली त्या आकाशाचं नाव होत ‘लता दीदी”. 

मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार अशोक सराफ (Ashok Saraf) यांना प्रदान करण्यात आल्यानंतर ते म्हणाले,”आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार न मोजता येणारे आहेत. मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी मोठा आहे”.