अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका?

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री सध्या तिहार तरुंगात आहेत. तुरुंगात त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ जामीन मंजूर करावा, अशी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ईडी आणि त्यांच्याविरोधात असलेल्या सर्व खटल्यांमध्ये जामीन मंजूर करण्यात यावा असं याचिकेत म्हटलं आहे.

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात एक खळबळजनक दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असतानाही ते जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत. त्यामुळे वैद्यकीय कारण पुढे करून ते जामीन मागू शकतात असा दाव ईडीने केला आहे. ED च्या दाव्यानंतर कोर्टाने तिहार जेल प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे. त्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

केजरीवाल यांच्या जीवाला धोका आहे हे पटवून देण्यासाठी टिल्लू ताजपुरीया, अतिक अहमद यांच्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे. अलिकडच्या काळात पोलिसांच्या ताब्यात असताना टिल्लू ताजपुरीया आणि अतिक अहमद यांच्या हत्या झाल्या होत्या. दरम्यान न्यायालय ही याचिका स्वीकारते की फेटाळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांनी गोड खाऊ नये हे सांगितलेलं आहे. मात्र केजरीवाल यांना त्यांच्या घरून डबा येतो त्यात आंबे, मिठाई असते. हे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह वाढू शकतो. याचा फायदा घेऊन ते मेडिकलचं कारण देऊन जामीन मागू शकतात, असा दावा ईडीने केला आहे.१२० शुगर लेवल नॉर्मल मानली जाते, मात्र अरविंद केजरीवाल यांच्या साखरेची पातळी २४३ पर्यंत पोहोचली आहे, हे प्रमाण खूपच आहे. अरविंद केजरीवाल यांना डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसारच जेवण दिलं जात आहे, असं केजरीवाल यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यावर कोर्टाने त्यांचा डाएट चार्ट मागीतला आहे.