जोरदार शक्तिप्रदर्शन करत बारणेंनी भरला अर्ज..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. २२) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

सोमवारी सकाळी आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पीएमआरडीए कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते आकुर्डी येथे आले होते.

रॅली अर्ध्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निघाले

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर नेते भक्ती शक्ती येथून रॅली मधील विजयी रथात बसले होते. मात्र म्हाळसाकांत चौकाच्या थोडं पुढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रॅलीच्या रथातून खाली उतरले. त्यानंतर वाहनांत बसून थेट पीएमआरडी कार्यालय गाठले. काही वेळानंतर उमेदवार श्रीरंग बारणे हे अर्ज भरण्यासाठी पोहचले.

संजोग वाघेरे आज भरणार उद्या अर्ज…

बारणेंचे मुख्य प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे पाटील मंगळवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, उपनेते सचिन अहीर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.