धुळ्यामध्ये संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर केली दगडफेक

धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये ४ पोलिस जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीचार्ज केला. तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी घटनास्थळी महिलांनी जोरदार राडा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील करवंद येथे बुधवारी मुलाला मारल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या तरुणाची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला आज पोलिसांनी अटक केली. या आरोपीला पोलिसांनी ज्या पोलिस ठाण्यात ठेवले होते. त्या पोलिस ठाण्याच्याबाहेर हत्या झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आमच्या समोर त्याला फाशीची शिक्षा द्या.’, अशी मागणी करत हत्या झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर जोरदार राडा केला. यावेळी संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये ४ पोलिस जखमी झाले.

संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना १० अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हा जमाव खूपच आक्रमक झाला होता. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत सौम्य लाठीचार्ज देखील केला. सध्या या जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे. या परिसरामध्ये तणापूर्व शांतात पाहायला मिळत आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.