नक्षलग्रस्त गडचिरोली सर्वाधिक टक्के मतदान…

राज्यासह देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी 5 मतदारसंघांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली होती. या पाच मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं, याची आकडेवारी आता समोर आली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानात 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 54.85 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा आकडा खरंतर जास्त असणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही.

विशेष म्हणजे नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आज इतर चार मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान झालं आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 64.95 टक्के मतदान झालं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पण नागपूर सारख्या लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी टक्के मतदान झालं आहे. नागपूरमध्ये आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 47.91 टक्के मतदान पार पडलं आहे.

महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमूर मतदारसंघानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात झालं आहे. इथे 56.87 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा नंबरल लागतो. इथे 55.11 टक्के मतदान पार पडलं आहे. यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात 52.38 टक्के मतदान पार पडलं.

सर्वात कमी मतदान हे नागपूरमध्ये 47.91 टक्के इतकं झालं आहे. ही आकडेवारी आज संध्याळी 5 वाजेपर्यंतची आहे. नागपूरच्या मतदानाची आकडेवारी ही खरंच चिंतेची बाब आहे. नागरिकांनी स्वत:हून मतदानासाठी पुढे येणं अपेक्षित आहे. प्रशासनाची मोठी यंत्रणा यासाठी कामाला लागली असते. याशिवाय देशाच्या सक्षम लोकशाहीसाठी तसेच एक जबाबदार नागरीक म्हणून मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे.

चंद्रपुरात मतदानाचा टक्का घसरला

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पूर्व विदर्भातील अन्य चार लोकसभा मतदारसंघासह संध्याकाळी सहा वाजता मतदान संपुष्टात आले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी व्हीव्हीपॅटमधील गोंधळ तर काही ठिकाणी मतदार यादीत नागरिकांची नावे गहाळ असल्याची अनेक प्रकरणे पुढे आली. यामुळे नागरिक मतदान केंद्रावरून बाहेर जाताना दिसले. काही ठिकाणी नागरिकांनी याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त केली.

मतदान कार्ड अपडेट झाल्यामुळे देखील काहींची नावे यादीतून गहाळ झाल्याचे बघायला मिळाले. उन्हाचा तीव्र तडाखा बघता संध्याकाळच्या सुमारास नागरिकांनी मतदान केंद्रावर येणे पसंत केले. मात्र यादीत नावच नसल्याने अनेकांना परत जावे लागले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 64.84 टक्के एवढे मतदान झाले होते. प्रशासनाच्या अनेक प्रयत्नानंतरही पाच वाजेपर्यंत हे मतदान 55.11% एवढे झाले होते. अंतिम आकडेवारी मात्र रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.