निलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. डॉ. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्र्रात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होईल. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उपस्थित राहतील अशी माहिती दिली आहे. 

निलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, अर्ज भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी येणार आहे. त्यांच्याशी माझं कालच बोलणं झाल असून लवकरच अर्ज भरण्याची तारीख सांगू, असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची उद्या सांगता

अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची उद्या सांगता होणार आहे. यावेळी अहमदनगरमध्ये शरद पवार आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात हे उपस्थित असतील. निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच नगर दौऱ्यावर येणार आहेत.