बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का..!
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. बारामती पाठोपाठ बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर शहराध्यक्ष यशवंत डाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर रविकांत राठोड यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. रविकांत राठोड यांचे शरद पवार यांचे खांदे समर्थक आहे. मात्र ऐन निवडणूक काळात त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रविकांत राठोड अजित पवार गटात
शरद पवार गटाला बीडमधून मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने थेट अजित पवार गटात प्रवेश केला आहे. रविकांत राठोड यांनी आज अजितदादा गटात प्रवेश केला आहे. रविकांत राठोड हे शरद पवारांचे खांदे समर्थक आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. रविकांत राठोड भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना समर्थन दिलं आहे.
समाजाच्या भूमिकेच्या समरस व्हावं, यासाठी आज मी वेगळा निर्णय घेतला आहे. बीड लोकसभेसाठी मी शरद पवार साहेबांना उमेदवारी मागितली होती. मात्र इथं बलाढ्य लोकांनीच निवडणूक लढवावी, असं समीकरण आहे. शरद पवारसाहेब यांच्यावरती मी नाराज नाही. त्यांच्या पदाधिकाऱ्यांमुळे मी नाराज होतो. मी अनेक दिवसांपासून पक्षांच्या वरिष्ठांच्या संपर्कात होतो. मात्र मला मान सन्मान देण्यात आला नाही. त्यामुळे आज मी पवार साहेबाना सोडून अजित पवार यांच्या गटात आलो आहे, असं रविकांत राठोड यांनी म्हटलं आहे.
मला बंजारा समाजाच्या विकासाचे आश्वासन देण्यात आलं आहे. मला महामंडळ देण्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे माझ्या समाजाचा फायदा होणार आहे. माझ्या उमेदवारी मुळे पंकजा मुंडे धोक्यात आल्या होत्या. समाजाने मला आग्रह केल्यामुळे मी पंकजा मुंडे यांना साथ देण्याचे ठरवलं आहे. बजरंग सोनावणे यांनी पैसे देवून लोक आणले. त्यांच्या पाठीमागे समाज नाही. पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे समाज आहे, असंही रविकांत राठोड म्हणाले.