मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळें

आमची प्रतिष्ठा इतकी हलकी नाही की एका निवडणुकीमध्ये जाईल. पक्षात आणि चिन्हात बदल झाल्यापासून आपल्या पक्षात गर्दी झाली असल्याची खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. आज बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरमध्ये महाविकास विकास आघाडीची सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील सासवडमधील पालखी तळावर सभा झाली. 

मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली 

सुप्रिया सुळे यांनी सभेत संबोधित करताना अजित पवारांवर जोरदार तोफ डागली. त्या म्हणाल्या की, मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली असून गँग कमी झाली आहे. आपलं चिन्ह गेला नसून पळवून नेलं असल्याची टीकाही त्यांनी केली. शशिकांत शिंदे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले. आमच्या कुठल्याही उमेदवाराला अटक करा आम्ही रान पेटवू, असा इशारा त्यांनी दिला. सगळे एकत्र येऊन काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार हा नेता दिल्लीत सहन होत नाही म्हणून साहेबांच्या मागे लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सुप्रिया सुळे यांनी स्थानिक मुद्यावरून बोलताना सांगितले की, पुरंदरचे अंजीर जर्मनीत जाता त्यामुळे टॅक्स कमी झाला पाहिजे. जर तसाच चालू राहिला तर सरकारला सांगू जा काय करायचं ते करा आम्ही टॅक्स भरत नाही. चाकणला विमानतळ झालं नाही म्हणून मी विमानतळ इकडे आणल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्ही जमीन घेतली नाही, तिथं जमीन कुणी घेतली हे मला माहित नसल्याचे त्या म्हणाल्या.

18 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. माझ्यावर विकासकामांवरून टीका केली जाते. भाषण कोण लिहित आहे माहीत नाही, वैयक्तिक टीका केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. भाजपने 2014 मध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार विरोधात यांनी आंदोलने केली, आता काय परिस्थिती आहे ते बघा म्हणत एक ऑडिओ क्लिप देखील प्ले केली.