लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची शिवसंग्रामची भूमिका …

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम पक्ष कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. पक्षाने तटस्थ राहण्याची  भूमिका घेतली आहे, अशी माहिती शिवसंग्रामच्या ज्योती मेटे आणि प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी आज (दि.२७) पत्रकार परिषदेत दिली.
यासंदर्भात पुण्यात शिवसंग्राम संघटनेची बैठक पार पडली. ज्योती मेटे यांनी राज्यभरातून आलेल्या शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठकीत हा निर्णय घेतला.

ज्योती मेटे म्हणाल्या की, राजकारणात अनुषंगिक भूमिका असतात. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेणे यालाच राजकारणात महत्व असते. आमचीही भूमिका अशीच होती. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत बीडच्या जनतेची इच्छा होती. परंतु, जनतेचा सन्मान राखून निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करणार नाही.

निवडणुकीनंतर पुन्हा बैठक घेऊन १२ जागा विधानसभेच्या लढवण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यावेळी कोणत्या पक्षाची मदत घ्यायची का स्वतंत्र लढायचे याबाबत त्यावेळीच निर्णय घेतला जाईल. आम्ही विधानसभेची चाचपणी केली होती. त्यामुळे जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी आम्ही विधानसभेबाबत निर्णय घेतला आणि लोकसभेतून माघार घेतली.

तानाजी शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीमध्ये होतो, हा भूतकाळ आहे. का लढणार नाही याचं कारण सांगायची गरज नाही. नाराजीचा प्रश्न नाही. सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदान करणार पण पक्षाला पाठिंबा देणार नाही.