महायुतीत ठाण्याच्या जागेवरुन भाजप पदाधिकारी आक्रमक
महायुतीत ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेकडून नुकतंच ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी नाराज आहेत. “आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाहीत”, अशी भूमिका या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तब्बल 64 माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच तब्बल 539 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक हे इच्छुक होते. मात्र नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळतंय. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वजण मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाले. हे सर्व पदाधिकारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार आहेत. दुसरीकडे नरेश म्हस्के यांनी आपल्याला आमदार गणेश नाईक यांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.
नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?
“गणेश नाईक यांनी मला आशीर्वाद दिला आहे. काही चिंता करु नका. नवी मुंबईतून जबदस्त लीड मिळेल. सर्व काही नीट आहे. तुला काही अडचण असेल तर मला सांग, अशा पद्धतीने गणेश नाईक यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे”, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.
पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे?
“आम्ही 2019 मध्ये 65 नगरसेवकांनी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळीदेखील विधानसभा निवडणुकीवेळी देखील आम्हाला डावललं गेलं. संजीव नाईक यांनी 10 वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व केलं. तिसरी टर्म असताना त्यांना डावलण्यात आला. आम्ही तो अन्याय सहन केला. गणेश नाईक नंतर रेकॉर्ड मतांनी निवडून आले. आम्हाला खात्री होती की, त्यांना मंत्रिपद मिळेल, पण तिथेही त्यांना डावलण्यात आलं. आज 16 मार्चला आचरसंहिता आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज दाखल करण्याचं काम सुरु आहे”, असं भाजपचे पदाधिकारी म्हणाले.
“आमच्या भाजपच्या वतीने अनेक बैठका होत असताना आम्हाला सांगण्यात आलं की, कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्षाला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सोडण्यात येईल, भाजपच्या वतीने एकमेव उमेदवार इच्छुक होते ते म्हणजे संजीव नाईक. दुसरा कुठलाही उमेदवार इच्छुक नव्हता. आम्ही सर्व खात्रीशीर होतो. पण काल सकाळी बातमी येऊन धडकली. नरेश म्हस्के यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. ते भले महायुतीचे उमेदवार आहेत. पण ठाणे लोकसभा मतदारसंघात जे 4 विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या प्रभावाखाली आहेत. नवी मुंबईत साडे आठ लाख मतदार आहेत, मीरा भाईंदरमध्येदेखील भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक झालाय”, अशी माहिती आक्रमक भाजप पदाधिकाऱ्याने दिली.
“आमची महापालिका 25 वर्षांपासून सातत्याने एक नंबरला येत आहे. ते सगळं असताना त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेण्यात आल्याची भावना सगळ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की, आम्ही कशासाठी त्यांचा प्रचार करायचा? कशासाठी त्यांच्या चिन्हाचा वापर करायचा?”, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्याने मांडला.