सांगलीत पक्ष विरोधात जाणाऱ्यांवर भाजप आक्रमक

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील उमेदवार आहेत. मात्र, त्यांना विरोध करीत पक्षातूनच काही पदाधिकारी कार्यकर्ते काम करीत असल्याने अखेर जिल्हा भाजप आक्रमक झाले आहे. आशा कार्यकर्त्यांना पदावरून व पक्षातून निलंबित करण्याची कारवाई जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील व प्रकाश ढंग करीत आहेत.

माजी आमदार विलासराव जगतापांचा राजीनामा

जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सर्वात प्रथम संजयकाका यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. काकांना उमेदवारी मिळताच त्यांनी पक्षाचा राजीनामा देत, विरोधी अपक्ष उमेदवार आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना पाठींबा दिला. विलासराव जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी संजयकाका यांच्या कार्यकर्त्यांनी केली, मात्र तत्पूर्वीच जगताप यांनी स्वतःच पक्षाचा राजीनामा दिला.

भाजपच्या पाच नगरसेवकांनी दिला विशाल पाटील यांना पाठिंबा

त्यानंतर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या असणाऱ्या मिरज शहरातील भाजपच्या पाच नगरसेवकांनीदेखील विरोधाची भूमिका घेतली. त्यावर कारवाईचा इशारा देऊन एका नगरसेवकाचे मतपरिवर्तन करण्यात यश आले. इतर चार नगरसेवकांचा पक्ष विरोधी कारवाईचा अहवाल शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी प्रदेशाकडे पाठवला. मात्र, तत्पूर्वीच त्या चार नगरसेवकांनी स्वतःच राजीनामा दिला. भाजपच्या बंडखोर नगरसेवक संदीप आवटे, निरंजन आवटी, आनंदा देव माने आणि शिवाजी दुर्वे यांचा समावेश आहे.

जतचे तालुकाध्यक्षांवर कारवाई

जतचे भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर देखील शुक्रवारी कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणूक २०२४ कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. संजय पाटील (काका) हे निवडणूक लढवत आहेत.

पक्ष विरोधी काम केल्याने कारवाई

पक्षाचा विचार व ध्येयधोरण घेऊन भाजप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र, आपण पक्षाचा विचार व ध्येय धोरणा यापासून दूर जाऊन पक्ष विरोधी काम करीत आहात. यामुळे आपण पक्षामध्ये राहून पक्ष विरोधी काम करीत असल्याने आपल्याला अध्यक्ष, जत भाजपा मंडल या पदावरून आतापासून निलंबन करण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जारी केले आहे.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई

दरम्यान आता भाजप विरोधात उघड उघड काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ लागल्याने, भाजपचे काही नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते गुपचूप विरोधात काम करीत असल्याची जोरदार चर्चा भाजप प्रचार कार्यालयात दबक्या आवाजात सुरू आहे.