कोल्हापूरच्या कडवी धरणात ९६% पाणीसाठा, ‘ओव्हरफ्लो’ची शक्यता
कोल्हापूर जिल्ह्यातील निनाई परळे येथील कडवी धरण(dam) सध्या ९६% भरले असून, लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी असून, सध्या ६८.४३ दलघमी इतका पाणीसाठा आहे. कडवी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे.
कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाणीपातळी ६००.५० मीटरवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १०० मिमी पावसाची नोंद झाली असून, रविवारी दुपारी ४ वाजता ८ तासांत ८२ मिमी पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत कडवी पाणलोट क्षेत्रात १७९० मिमी पाऊस झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०८ मिमी अधिक आहे.
धरणातून सध्या विद्युत गृहातून प्रतिसेकंद २२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन, कडवी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोपार्डे, भोसलेवाडी, शिरगाव, सवते-सावर्डे, सरूड-पाटणे, येळाणे ही बंधारे आधीच पाण्याखाली गेली आहेत.
कडवी धरण ओव्हरफ्लो झाल्यास, कडवी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून, सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
हेही वाचा :
धनंजय मुंडेने अमित शाहांच्या शरद पवारांवरील टीकेला दिला विरोध
गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर दिनेश कार्तिक स्पष्टच बोलला, “मला वाटतं तो योग्य निवड आहे”
पावसाळ्यात हेल्दी खाणं: पालकापासून बनवा ‘स्टीम्ड स्पिनच नगेट्स’