‘शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा’; शरद पवार गटाच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’वरुन भाजप आक्रमक
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. निवडणूकीचा(political news) कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी देखील राजकारण रंगले आहे. विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली असून शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली. तर अजित पवार गटाने जनसन्मान यात्रासुरु केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरु असून उद्धव ठाकरे(political news) यांच्या देखील सभा पार पडत आहेत. त्याचप्रमाणे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु केला असून आरक्षण मिळाले नाही तर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, भाजप नेत्यांनी शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेवरुन निशाणा साधला आहे.
शरद पवार गटाच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीचा शुभारंभ केला आहे. शिवजन्मभूमी जुन्नर येथून या यात्रेला प्रारंभ झाला. शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीची पुजा करुन शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे असे नेते उपस्थित होते.
मात्र या यात्रेवरुन महायुती आक्रमक झाली आहे. भाजप नेते केशव उपाध्याय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार गटाला खडेबोल सुनावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मिळवण्याचा त्यांचा मनसुबा असल्याची घणाघाती टीका केशव उपाध्याय यांनी केली आहे.
केशव उपाध्याय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली तथाकथित शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निव्वळ निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला फार्स आहे.
अन्यथा ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा यांनी रचलेला आहे, त्याच शिवरायांच्या वाघनखांवर यांनी शंका घेतली नसती. छत्रपतींच्या अजोड पराक्रमाचं आणि औरंगजेबाच्या नामुष्कीचं प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचं महायुती सरकारनं केलेलं नामकरण यांच्या पोटदुखीचं कारण ठरलं नसतं,” असे ते म्हणाले.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “अगदी ताजे उदाहरण असलेला वक्फ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणणारा नवा कायदा पाहून यांना पोटशूळ उठला नसता. कौतुक आक्रमकांचं आणि यात्रा शिवरायांच्या नावाने, असला स्वराज्यद्रोही प्रकार यांनी केला नसता. याउलट, ‘मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही’ हा देदीप्यमान इतिहास स्मरणात ठेवून महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मराठी गौरवाला साजेशा इतमामाने राज्यभरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला.
शिवरायांच्या शिकवणुकीप्रमाणे रयतेची काळजी वाहणारा राज्यकारभार आमच्या सरकारकडून सुरू आहे. सर्व समाजघटकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवून शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवली.”
“नुकतीच राज्यातल्या माय-माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली; पण विरोधक मात्र रांझ्याच्या पाटलाप्रमाणे या योजनेत मोडता घालण्याचा प्रयत्न करताहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. म्हणूनच म्हंटलं की, शिवरायांच्या विचारांची पालखी महायुतीने समर्थपणे आपल्या खांद्यांवर पेललीय; तर महाविकास आघाडी नुसतीच शब्दांची भोई बनलीय,’ अशी घणाघाती टीका केशव उपाध्याय यांनी केली आहे.
हेही वाचा:
विनेश फोगाटला मेडल मिळणार?, अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?
शाहरुखच्याच चित्रपटात त्याच्या मुलीसोबत रोमान्स करणारा ‘हा’ अभिनेता कोण?
ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरणार; ‘या’ तारखेनंतर पुन्हा गडागडाटासह पाऊस परतणार!