“कोलकाता घटनेच्या निषेधार्थ सांगली व मिरजसह जिल्ह्यातील रुग्णसेवा ठप्प, डॉक्टरांचा संप तीव्र”
कोलकाता येथे महिला डॉक्टरवर(doctor) झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि वैद्यकीय व्यवसायाला कायदेशीर संरक्षण मिळावे, या मागणीसाठी शनिवारी सांगली, मिरज, पलूस, जत, कवठेमहांकाळ, इस्लामपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील रुग्णालयात बाह्य रुग्णसेवा बंद ठेवण्यात आली.
या बंदमुळे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या वैद्यकीय केंद्रांपैकी एक असलेल्या मिरजेतील रुग्णसेवा ठप्प झाली, तर सांगली जिल्ह्यातील शेकडो रुग्णालयांनीही या बंदला पाठिंबा दिला.
देशव्यापी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनामुळे बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. औषध विक्रेता संघटनांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला, त्यामुळे औषधांची दुकाने बंद होती. सांगली आणि मिरजेसह विविध ठिकाणी शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे संप सुरू असून, फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
सांगलीतील शासकीय जिल्हा रुग्णालय आणि मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बाह्य रुग्ण सेवेला मोठा फटका बसला आहे. येथील प्राध्यापकांकडून अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू असले तरी, रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रविवारी बाह्य रुग्ण सेवा पुन्हा सुरू होणार असली तरी, सोमवारी रक्षाबंधनामुळे सुटी असल्याने सेवा बंद राहणार आहे.
दरम्यान, डॉक्टरांनी दोषींना कडक शिक्षा आणि वैद्यकीय व्यवसायाला अधिक सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व्यवसायावरील वाढत्या हल्ल्यांबद्दल अस्वस्थता वाढली असून, डॉक्टरांनी देशभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही नाही मिळाले? ‘या’ ठिकाणी करा तक्रार!
“महिलेला ‘उचलून घेण्याची’ धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल”
बिग बॉसच्या घरात वादळ येणार? अभिजीत बिचुकलेची वाइल्ड कार्ड एंट्रीची चर्चा