सांगलीतील रिक्षा-टॅक्सी चालकांना होणार लाभ
सांगली : राज्यात धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा(Rickshaw) आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अखेर स्थापना झाली आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहेे. सांगली जिल्ह्यातील ८ हजार रिक्षा चालक व २८०० टॅक्सी चालक यांना याचा लाभ हाेणार आहे.
रिक्षा(Rickshaw) व टॅक्सी चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. त्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू होती. अखेर शासनाने १६ मार्च २०२४ रोजी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब’ नावाने मंडळ स्थापन करण्यात आले आहे. कल्याणकारी मंडळाचा सभासद होण्यासाठी रिक्षा व टॅक्सी चालकांकडे परवाना व बॅज असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाकडे ८ हजार १९२ रिक्षांची नोंद आहे. तसेच टॅक्सींची संख्या २८१० आहे. त्यामुळे जवळपास दहा हजारहून अधिक जणांना मंडळाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो. कल्याणकारी मंडळाकडे वार्षिक वर्गणी, शासकीय अनुदान, नोंदणी शुल्क आणि इतर मार्गाने निधी संकलित होईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागेल.
ऑटो रिक्षा परवाना धारक, टॅक्सी चालक यांची नोंदणी आरटीओ कार्यालयामार्फत केली जाईल. नोंदणी केलेल्यांना ओळखपत्र दिले जाईल. मंडळाचा सभासद होण्यासाठी ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी परवाना, बॅज असणे बंधनकारक राहील. पात्र अर्जदाराच्या कुटुंबातील चार सदस्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी आणि ओळखपत्र शुल्क पाचशे रूपये असेल. त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क तीनशे रूपये राहणार आहे.
जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसहाय्य, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान आदी योजनांचा लाभ मिळू शकेल.
कल्याणकारी मंडळाची जिल्हा व राज्यस्तरीय समिती असेल. समित्यांची रचना शासन निर्णयानुसार असेल. मुख्य कार्यालय मुंबईत असेल. जिल्ह्यात देखील समितीचे कार्यालय कार्यरत राहील.
हेही वाचा:
महाराष्ट्र हादरला! ‘या’ जिल्ह्यात 2 सख्ख्या बहिणींवर अत्याचार
विधानसभेपूर्वीच भाजपकडून जोरदार बॅनरबाजी; फडणविसांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
इंजिनिअरनं एकीकडे नोकरी करत 60 गुंठ्यात रताळ्यातून कमवले 6.5 लाख, सांगलीतल्या तरुणाची होतेय वाहवा!