ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप
सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली. या लढतीत उत्तम जानकर यांनी बाजी मारली. मात्र, आता उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केलाय. मतदानानंतर मतमोजणीत ईव्हीएम(EVM) मशीनमध्ये फेरफार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपला 64 हजार मते मिळाली होती. या वेळेला 54,000 मते मिळाली. मात्र मशीनमधील व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपकडे वळत असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मते मशीनमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.
ईव्हीएम(EVM) मशीनमध्ये कोणताही फेरफार होऊ शकत नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच जानकर यांनी गंभीर आरोप केलाय. तसेच आपण पुराव्यानिशी सिद्ध करू, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. जानकर नेमके काय पुरावे देणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मारकडवाडी गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. मात्र यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मारकडवाडी येथे सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.
मारकडवाडीत जमावबंदीचा आदेश लागू केला असून प्रशासनाने मतदान प्रक्रियेला विरोध केला आहे. मात्र गावकरी मतदानावर ठाम असून मतदानासाठी पाच बूथ तयार करण्यात आलेले आहे. यामुळे पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानासाठी मतदार यायला सुरुवात झाली मात्र अजूनही मतदान केंद्रात मतदानाची बॉक्स ठेवण्यात आलेले नाहीत.
मतदान सुरू होताच हे बॉक्स पोलीस उचलून घेऊन जाणार आहेत, असा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. आतापर्यंत मतदानाला केवळ 40 ते 50 नागरिक जमा झाले असून यात दहा ते बारा महिलांचा समावेश आहे. किमान 500 लोके जमल्यावर मतदान प्रक्रिया सुरू करणार असल्याचे जानकर यांचे म्हणणे आहे. आता हे मतदान नेमके कधी सुरु होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर मारकडवाडी येथे पोलिसांच्या दबावामुळे मतदार बाहेर येत नसल्याचा आरोप धादांत खोटा असून आम्ही फक्त कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी येथे आलेलो आहोत. मतदान प्रक्रिया सुरू केल्यावर आम्ही मतदानाचे बॉक्स उचलून नेणार असल्याचे आरोपही खोटे असल्याची भूमिका डीवायएसपी शिरगावकर यांनी माझाशी बोलताना मांडली.
ही मतदान प्रक्रिया झाल्यानंतर नियमानुसार गुन्हे दाखल केले जातील मात्र ही प्रक्रिया सुरू होऊ नये यासाठी आमचा कोणताही दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले. मारकडवाडी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असला तरी बंदोबस्त मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत थांबविण्यात आलेला आहे.
हेही वाचा :
शाळेच्या वेळेत बदल करा’ थंडीमुळे शाळेच्या वेळा बदण्याची मागणी
कोल्हापुरात खुलेआम मटका आणि अवैध दारूविक्रीला ऊत; पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष
अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर?; आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता