मनोज जरांगे पाटलांच्या दोन मागण्या झाल्या मान्य; काय असणार पुढची रणनीती?

जालना : मराठा आरक्षणाचा(Reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जानेवारीमध्ये जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण देखील केले. यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करत राज्यभर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मराठा आरक्षण(Reservation)आणि आंदोलकांसंबंधित 8 मागण्या केल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवेळी जरांगे पाटील यांनी या मागण्या केल्या होत्या. यातील चार मागण्या या मान्य केल्या जातील असे आश्वासन सरकारकडून दिले जात होते. त्यातील दोन मागण्या या मान्य झाल्या आहेत. शिंदे समितीला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. मात्र इतर देखील मागण्या पूर्ण करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्य सरकारने शिंदे समितीला मुदत वाढ दिली आहे. आता त्या समितीला मनुष्यबळ द्या. समितीला बसवून ठेवू नका. फक्त मुदत वाढ देऊन उपयोग नाही, आता महाराष्ट्रभर ही समिती गेली पाहिजे. समितीने नोंदी शोधल्या पाहिजे. समितीला बसण्यासाठी कक्ष दिले पाहिजे. त्यांना निधी कमी पडता कामा नये. सगळ्या व्हॅलिडीटी झाल्या पाहिजे. जे प्रमाणपत्र रोखून धरले ते तात्काळ दिले पाहिजे,” असे स्पष्ट मत मराठा नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटबाबत मत व्यक्त केले आहे. यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असल्याचा दावा केला जातो. या गॅझेटबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करतो असे सांगितले आहे. बॉम्बे गव्हर्मेंट आणि सातारा संस्थान हे आता शिंदे समितीकडे आहे. आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार आहे. गॅझेटचा अभ्यास शिंदे समितीने केलेला आहे. आता तो सरकारला करायचा आहे. त्यामुळे गॅझेटच्या अंमलबजावणीची वाट आम्ही आता पाहत आहोत,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

येत्या 15 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला होता(Reservation). याबाबत मत मांडताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “पंधरा तारखेपासून उपोषण करण्याचे ठरवले होते. त्यामुळे आज संध्याकाळी किंवा उद्या मी गावकऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी आंतरवालीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात निर्णय जाहीर करू.

परंतु आता मागण्या मान्य करायला लागले म्हणून आम्ही सुद्धा बोलणार नाही. फक्त तुम्ही खोटे करू नका हे आमचे मागणे आहे. तुम्ही मराठा आंदोलन म्हणून कुणालाही नोटीस नाही देऊ शकत नाही .त्यांच्यावर दुसरे काही प्रकरण असेल तर ठीक आहे. परंतु मराठा आंदोलन म्हणून मी खपवून घेणार नाही. काल जो निर्णय सरकारने घेतलाय त्यावरून सरकार सकारात्मक आहे, असे वाटत आहे. पुढच्या मंगळवारपर्यंत ते मागण्या मान्य करतील,” असा विश्वास त्यांच्यावर ठेवू या, असे मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला अणखी एक मोठा धक्का

मुलं रात्री 2 वाजता उठतात आणि आई-वडिलांना…कपिल शर्माचं ‘ते’ विधान चर्चेत!

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; इंस्टाग्राम सारखं म्युझिक टूल कसं वापराल?