सांगली ‘कोयताकांड’ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं

सांगली आणि मिरज शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये खून झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. काल (23 फेब्रुवारी) रात्री सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाखाली एका महिलेचा खून(Murder) झाला, तर मिरजेमध्ये कोयता गँगमधील वादातून एका युवकाचा जीव गेला.

सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून
सांगली शहरात कौटुंबिक कारणातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून(Murder) करण्यात आला. आयर्विन पुलाखाली प्रियांका चव्हाण या महिलेची तिच्या पतीने गळा चिरून हत्या केली. प्रियांका आणि तिच्या पतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. प्रियांका आपल्या माहेरी सांगलीवाडीत राहत होती. मात्र, तिचा पती जकाप्पा चव्हाण तिला भेटण्यासाठी सांगलीत आला होता. रात्री नऊच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात जकाप्पाने कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला.
हल्ल्यानंतर जकाप्पा चव्हाण घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासानुसार, जकाप्पाला दारूचे व्यसन होते आणि तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच त्याने हा क्रूर कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरजमध्ये कोयता गँगच्या वादातून युवकाचा खून
मिरज शहरात कोयता गँगमधील दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला आणि त्याचा परिणाम एका युवकाच्या मृत्यूमध्ये झाला. सराईत गुन्हेगार कुणाल वालीवर याचा कोयत्याने वार करून खून(Murder) करण्यात आला. त्याचा भाऊ वंश वालीवरवरही प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे. मात्र, या हत्येने कोयता गँगमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या दोन्ही घटनांमुळे सांगली आणि मिरज शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना होळीचं गिफ्ट! महायुती सरकारचा मोठा निर्णय
मोहम्मद शामी पुन्हा जखमी? रोहित शर्माच्या अडचणी वाढणार
तरुणी धावत्या ट्रेनला लटकून बनवत होती रिल इतक्यात… Video Viral