महायुतीचा अर्थसंकल्प लोकप्रिय योजनांना कात्री

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळावे म्हणून तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी लोकप्रिय योजना जाहीर करून राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला, पण आता “पैशाचे सोंग काढता येत नाही” हे या सरकारच्या लक्षात आलेले दिसते. कारण महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प (budget) सादर करताना अर्थमंत्री अजितदादा पवार यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. सोमवारी दुपारी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा तुटीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.

जागतिक स्तरावरील काही बड्या उद्योजकांनी महाराष्ट्रात 15 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार राज्य शासनाने बरोबर केलेले आहेत. येत्या पाच वर्षात ही परकीय गुंतवणूक 40 लाख कोटीवर जाईल, आणि त्यातून 15 लाख रोजगार उपलब्ध होतील या गृहीतकांचा आधार या अर्थसंकल्पात घेतलेला दिसतो आहे.

पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील नियोजित बंदर हे जगातील दहा-पंधरा पैकी एक असेल असा दावा यापूर्वीच करण्यात आला असून, या बंदराजवळ नवीन विमानतळ उभारले जाणार आहे, याशिवाय वाढवण बंदर हे दळणवळणाने जोडले जाणार आहे. नक्षलवाद हद्दपार करण्यासाठी गडचिरोली जिल्हा हा स्टील हब म्हणून वास्तवात आणला जाणार असल्याची घोषणा अजित दादा यांनी केली आहे.

या अर्थसंकल्पात(budget) मुंबई शहराला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर ठेवून मुंबईसाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्थिक विकासाचा केंद्र बनवण्याचा निर्धार अर्थमंत्र्यांनी केला आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय व्यापार प्रकल्पाची संख्या पाच वर नेली जाणार आहे.

राज्य शासनाने सुमारे सातशे किलोमीटर अंतराच्या शक्तिपीठ महामार्गावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यासाठी 86 हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला जाणार आहे. दोनशे सदतीस किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजना यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रासाठी 9710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज दिली जाणार आहे. एक तालुका एक बाजार समिती अशी एक नवी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला शाश्वत बाजार भाव मिळावा यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे. नानाजी देशमुख कृषी विकास दुसरा टप्प्यासाठी 351 कोटी रुपयांचा निधी तसेच कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी काही योजना पुढे आणल्या गेलेल्या आहेत. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना या सरकारकडून कर्जमाफीची घोषणा अपेक्षित होती मात्र या अर्थसंकल्पात त्याबद्दल कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. जलसिंचनासाठी पाच हजार कोटी रुपयांची तर तूद केली आहे.

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे केले जाणार आहे. तुळापूर मधील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अखेरच्या टप्प्यात आहे तर संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारले जाणार आहे, हरियाणा नजीकच्या पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे स्मारक उभ केले जाणार आहे, आंबेगाव येथील शिवशक्ती च्या तिसऱ्या टप्प्यासाठी 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत तसेच बाळासाहेब ठाकरे स्मारकांसाठी 200 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. अटलजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईत स्मारक उभा केले जाणार आहे, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकासाठी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सागरी किनारी जिल्ह्यांसाठी जलवाहतूक व्यवस्था व्हावी म्हणून 8400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महायुतीचे सरकार अस्तित्वात येण्यासाठी महाराष्ट्रातील महिलांनी मताच्या माध्यमातून आपले योगदान दिले होते. या लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा दिले जातील अशी लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आली होती मात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. आणि त्यासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महायुतीचा 2025 चा अर्थसंकल्प(budget) हा राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नाही तर कंत्राटदारांचे भले करण्यासाठी आहे, सामान्य माणसांच्या तोंडाला पाने असणारा हा अर्थसंकल्प आहे, पोकळ घोषणा देणारा हा अर्थसंकल्प आहे, निवडणुकीत दिलेल्या लोकप्रिय घोषणा बाजूला ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका विरोधकांनी विशेषतः उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच महायुती घटक पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तरीही”पैशाचं सोंग या सरकारला काढता आलेलं नाही”हे मान्य करावेच लागेल. कारण सर्वसामान्य जनतेला थेट लाभ मिळेल अशी कोणतीच तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींनींच्या 2100 रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

मटण विक्रीसाठी राज्यात ‘मल्हार सर्टिफिकेट’! नितेश राणेंची घोषणा

धक्कादायक ! आरोग्य केंद्रात 19 विद्यार्थिनींचा विनयभंग; टवाळखोर भिंतीवरून चढून आत आले अन्…