राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर पकडला आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे.(alert)हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाल्यास महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून आज कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे आज ठाणे आणि मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, दरम्यान बदललेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही हाय अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात जोरदार पाऊस
सुरुवातीच्या पावसामुळे विदर्भात मोठं नुकसान झालं होतं, दरम्यान आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट
काल देखील हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता, मात्र पावसाने हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस जिल्ह्यात बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.(alert)जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51 टक्के एवढा पाऊस पडला आहे, दरम्यान हवामान खात्याने आणखी दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. धरणांच्या पाणीपातळीत देखील झपाट्यानं वाढ होत आहे.
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे . रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदी ही दुथडी भरून वाहत आहे. मात्र बदलापूर परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने अजूनही बदलापूर शहरात कुठेही पाणी साचल्याची घटना समोर आल्या नाहीत , पालिका प्रशासनाने उल्हास नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. (alert)कणकवली कुडाळ मालवणसह सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 34 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
रायगडमध्येही पाऊस
रायगड जिल्ह्याला आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा :