भाजीपाल्याचे भाव वाढल्याने शाकाहारी थाळी महागली

टोमॅटो, बटाटा आणि कांदा यांचे भाव कडाडल्यामुळे मे महिन्यात शाकाहारी थाळीची(vegetarian) किंमत मे २०२३ च्या तुलनेत नऊ टक्क्यांनी वाढून २७.८ रुपयांवर पोहोचल्याचे पतमांनाकन संस्था ‘क्रिसिल’ने म्हटले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत २५.५ रुपये होती.

एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किमतीत एक टक्क्याने वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये शाकाहारी (vegetarian) थाळीची किंमत २७.४ रुपये होती. शाकाहारी थाळीच्या तुलनेत मांसाहारी थाळीची किंमत मात्र वार्षिक सात टक्क्यांनी कमी झाली असल्याचे ‘क्रिसिल’ने म्हटले आहे.

‘क्रिसिल’च्या अहवालानुसार, मे महिन्यात वार्षिक आधारावर टोमॅटोच्या भावात ३९ टक्के, बटाटा ४१ टक्के आणि कांदा ४६ टक्क्यांनी महागला आहे, तर तांदूळ १३ टक्क्यांनी आणि डाळींचा भाव २१ टक्क्यांनी वाढल्याने शाकाहारी थाळीच्या किमतीतही वाढ झाली आहे. जिरे, मिरची आणि वनस्पती तेलाच्या भावात मात्र, घट झाली असल्याने या थाळीची किंमत आणखी वाढली नाही, असेही ‘क्रिसिल’ने नमूद केले आहे.

मे महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत मे २०२३ मधील ५९.९० रुपयांच्या तुलनेत सात टक्क्यांनी कमी होऊन ५५.९० रुपये झाली आहे. ब्रॉयलर म्हणजेच चिकनच्या किमतीत १६ टक्क्यांनी घट झाल्यामुळे मांसाहारी थाळीच्या किमतीत घसरण झाली आहे. या थाळीच्या किमतीत चिकनचा वाटा ५० टक्के असतो. एप्रिलमध्ये मांसाहारी थाळीचा खर्च ५६.३ रुपये होता, मे महिन्यात तो एक टक्का कमी झाला.

उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील सध्याच्या खाद्यपदार्थांच्या किमतींच्या आधारे घरी थाळी तयार करण्यासाठी येणारा सरासरी खर्च काढण्यात आला आहे.

हेही वाचा :

एआयमुळे मानवाचं अस्तित्त्व संपणार? कंपन्या तुम्हाला ठेवताहेत धोक्यात

मोठी बातमी… राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टी, ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

 ‘तर विधानसभेला घरी बसतील…’; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा