पत्नी सोडून गेल्याने पती निराश, दारूच्या नशेत पतीनं असं काही केलं की?

माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्यामुळे नाशिकच्या एका तरुणाने नैराश्यातून थेट पोलीस ठाणे(police station) गाठले. त्यानंतर अंमलदार कक्षात बसूनच त्यांने विषारी औषधाचे सेवन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) हा प्रकार घडला असून यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या तरुणाला अंबड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे निलेश साळवे (22, रा. मोरवाडी, सिडको) हा मजुरी काम करत असून, काही महिन्यांपूर्वी निलेशचा विवाह झाला होता. मात्र तो कामधंदा करत नसल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघुन गेली होती. 

अंमलदार कक्षात बसूनच विषारी औषधाचे सेवन 

पत्नी घरी नसल्याने निलेश हा तणावातून दारु प्यालेला होता. तो दारुच्या नशेतच अंबड पोलीस ठाण्यात गेला. निलेश साळवे याने अंमलदार कक्षात बसूनच कीटकनाशक औषध सेवन केल्याने पोलिसांची चांगली तारांबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी तात्काळ निलेशला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

ध्रुवनगरला चार लाखांची घरफोडी

घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाट उघडत सोन्याचांदीचे दागिने असा 3 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना ध्रुवनगर येथे घडली. फिर्यादी कैलास बाबूराव कटारे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा व लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडून त्यातील 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू 

सहाव्या मजल्यावरून खाली पडलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना चेहेडी पंपिंगजवळ घडली. श्री साई डेव्हलपर्स यांची चेहेडी पंपिंग स्टेशनजवळ बांधकाम साईट सुरू आहे. या ठिकाणी साईटवर काम चालू असताना श्रीकांत नवनाथ टिक्कल हे मजूर सहाव्या मजल्यावरून जमिनीवर पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा :

शिंदेंना किती ठिकाणी धक्का बसणार? विधानसभेत भाजपला 45 जागांवर फटका?

आषाढी वारी’साठी यंदा ST थेट तुमच्या गावात, 5000 जादा बसेस सोडणार.

महाविकास आघाडीत विधानसभा जागा वाटपाची तारीख ठरली!