कबनूर ता. हातकणंगले येथे प्रेमविवाहाच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव अनिल पुजारी वय २३, रा. चंदूर याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला.(record )हा धक्कादायक प्रकार लक्ष्मी मंदिराजवळ आज सकाळी घडला. गंभीर जखमी झालेल्या वैभववर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या हल्ल्याप्रकरणी मयूर आकाराम पुजारी रा. चंदूर, ओंकार बिरू पुजारी रा. तिळवणी, शुभम बोरसे रा. उदगाव, राहुल श्रीकांत कांबळे रा. आवळे गल्ली, इचलकरंजी व बंडा शिंदे या पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयित सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पुजारीने अवघ्या महिनाभरापूर्वी गायत्री विठ्ठल माने हिच्याशी प्रेमविवाह केला होता. (record )आज सकाळी सुमारास दहाच्या दरम्यान तो आपल्या मित्रासह दुचाकीवरून रुई रस्त्याकडील शेताकडे जात असताना लक्ष्मी मंदिराजवळ चार जणांनी त्याचा दुचाकीवर अडवून हल्ला केला. बंडा शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरून मुलीचे नातेवाईक मयूर पुजारी, ओंकार पुजारी, शुभम बोरसे व राहुल कांबळे यांनी तलवारीसह वैभववर हल्ला केला.सुरुवातीला वैभवला खाली पाडून, त्याच्या मित्राला बाजूला ढकलण्यात आले. मयूर पुजारी याने वैभवचा पाठलाग करत तलवारीने सपासप वार केले. हातावर अनेक वार करून तो गंभीर जखमी झाल्यावर डोक्याच्या पाठीमागेही वार करण्यात आले. त्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून पळून गेले.
डोक्यावर गंभीर वार होऊनही वैभव रक्ताच्या थारोळ्यातून उठत जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळाला व जवळील एका घरात शिरून स्वतःचा बचाव केला.(record ) त्याचा मित्र त्याला त्वरित आयजीएम रुग्णालयात घेऊन गेला. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.जखमी वैभव पुजारीवर पूर्वी जनावरे चोरीसह विविध गुन्ह्यांचे अनेक खटले दाखल असून, तो रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहापूर, शिवाजीनगर, शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड व इस्पुर्ली पोलीस ठाण्यांमध्ये त्याचे गुन्हे नोंदलेले आहेत.
हेही वाचा :