इचलकरंजीत दोन गटांत तुफान हाणामारी; तिघे गंभीर जखमी, १८ आरोपी अटकेत

इचलकरंजी, ४ जून: शहरातील सूर्योदयनगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा दोन गटांत पूर्ववैमनस्यातून तुफान हाणामारी(Fight) झाली. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी १८ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. याप्रकरणी एकूण २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्योदयनगर येथील एका कट्ट्यावर नौशाद मुजावर (२४), सागर शिकलगार (२०), आयुब अत्तार (२२) व सुशांत रानमाळे (२५) बसले होते. याच दरम्यान, प्रज्वल हळदकर (२२), युवराज जाधव (२९), अमरनाथ जाधव (२१) व इतर २० ते २२ युवक दुचाकींवर आले. त्यांनी लाकडी दांडके, चाकू व दगडांचा वापर करून चौघांवर हल्ला केला.

हल्ल्यात आयुब अत्तारच्या पाठीवर धारदार चाकूने वार करण्यात आला, तर नौशाद मुजावरला लाकडी दांडक्यांनी मारहाण(Fight) करण्यात आली. तिघेजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत सुशांत रानमाळे याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जलद कारवाई करत १८ आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रज्वल हळदकर, युवराज जाधव, अमरनाथ जाधव, अनिल कल्याणी, उत्कर्ष पाटील, चंद्रदीप झुटाळ, अतुल मोहिते, वेदांत पोळ, युवराज साठे, शिवम कांबळे, पुंडलिक बकरे, गणेश मोळे, जयंत कांबळे, दुर्वांकर खारकांडे, साहिल शेवाळे, आकाश कांबळे आणि राजवर्धन धामके यांचा समावेश आहे.

याप्रकरणी अन्य दोन संशयित योगेश कारवे व मंगेश खांडेकर यांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या घटनेतील गंभीर जखमी नौशाद मुजावरवर पूर्वी ‘जर्मनी गँग’च्या नावाखाली खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार आबिटकर करत आहेत.

हेही वाचा :