शाळेत घुसलेल्या ट्रकने घेतला चिमुकलीचा बळी

पुसद : तालुक्यातील आमदरी घाटामध्ये सुसाट वेगाने येणाऱ्या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने(truck) तो रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात व शाळेत घुसला. हा अपघात सोमवार (ता.१५) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडला. या अपघातात शीतल पांडुरंग किरवळे (वय सात) या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा मृत्यू तब्बल सहा तासानंतर उघड झाला. या अपघातातून एक गर्भवती महिला थोडक्यात बचावली.

पुसद तालुक्यातील आमदरी घाटामध्ये पुसदवरून नांदेडकडे जाणाऱ्या सिमेंट ट्रक(truck) (एम एच १०/सी आर ७७११) वरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या घरात घुसला. त्या घराजवळ शाळेचे शौचालय होते. घरासोबतच या ट्रकची धडक शौचालयाला बसली. त्यामुळे शौचालयाचा स्लॅब खाली पडला.

शाळेत आलेली शीतल किरवळे ही मुलगी शौचालयात गेली असावी आणि नेमक्या त्याचवेळी या ट्रकची धडक बसून स्लॅब खाली मुलगी दबली. शीतलचे आई, वडील शेतकरी आहेत. सायंकाळी शेतावरून घरी आल्यावर त्यांनी मुलगी शाळेतून का आली नाही याचा शोध घेतला असता मुलगी शाळेच्या स्लॅब खाली दबलेली आढळली.

हा अपघात सकाळी ११ च्या सुमारास झाला त्यावेळी पोलिसांनी कुठलिही जीवितहानी नाही असे सांगितले. मात्र रात्री मृतदेह आढळल्यावर गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. ही घटना घडली त्या वेळेस एक गर्भवती महिला ट्रकची धडक लागेल या भीतीने पळत असताना ती पडली व गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे.

घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय देवानंद कायंदे करीत आहेत. आमदरी नजीक यापूर्वी अनेक अपघात घडले. परंतु बांधकाम विभागाकडून कोणतेही परिणामकारक मार्गदर्शक फलक अथवा गावाला सुरक्षित करण्यासाठी असलेले कठडे लावण्यात आलेले नाहीत.

बांधकाम विभागांनी याकडे लक्ष पुरवावे अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी रात्री उशीरापर्यंत पुसद हिंगोली राज्य मार्ग आमदरीजवळ जाम केला. या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. सकाळी ११ वाजता अपघात घडला. त्यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी कुठलिही जीवितहानी झाली नसल्याचे गावकऱ्यांना सांगितले. त्याचवेळी योग्य तपास आणि जागेचा पंचनामा केला असता तर कदाचित शीतलचा जीव वाचला असता.

हेही वाचा :

7 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार घसघशीत वाढ

सावधान ! सकाळी उशिरा उठणं देतं ‘या’ गंभीर आजारांना निमंत्रण

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची आशा, भारताच्या 6 बॉक्सरवर सर्वांच्या नजरा!