वारणेत साकारली तब्बल 11 एकरांत 4 लाख 50 हजार स्क्वेअर फुटांची छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी
वारणानगर : ‘छत्रपती शिवरायांची मातीवर साकारलेली पहिलीच रांगोळी(rangoli) आहे. मिर्झापूरनंतर वारणेत छत्रपतींची सर्वांत मोठी रांगोळी साकारली आहे. ऐतिहासिक पावनभूमीत रांगोळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवराय अवतरले असून, राजमाता जिजाऊंचा आदर्श महिलांनी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येथे केले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रविवारी स्वराज्य युवा प्रतिष्ठान, ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने व वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या सहयोगाने छत्रपती शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी(rangoli) साकारली आहे. या रांगोळीच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्हाधिकारी येडगे बोलत होते.
विनयनगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमीच्या ११ एकर जागेत चार लाख ५० हजार स्क्वेअर फुटांची शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे काढण्यात आली आहे. यावेळी ‘स्वराज्याची गाथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित मान्यवर व शिवप्रेमींची मने जिंकली. स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांनी प्रास्ताविकात शिवरायांच्या रांगोळीबाबत संकल्पना मांडली. यासाठी आमदार विनय कोरे यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ताराराणी ब्रिगेडच्या तीनशेंवर महिला व मुलींनी ही रांगोळी पूर्ण केली. यावेळी आमदार कोरे यांच्या हस्ते अध्यक्ष समीर काळे यांचा सत्कार झाला. इंडिया बुक रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड यांनी रांगोळीचे ऑनलाईन व्हिडिओ व परीक्षणाच्या दृष्टीने माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
यावेळी आमदार अशोकराव माने, सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, ईशानी विनय कोरे, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सुराज्य फाउंडेंशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रमोदराव कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही व्ही. कारजीन्नी, सैनिकी शाळेचे प्राचार्य टी. बी. ऱ्हाटवळ, संचालक डॉ. प्रशांत जमने, प्रा. जीवनकुमार शिंदे, आशा चव्हाण, कस्तुरी निकम, संगीता मोरे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते. पूनम माने यांनी सूत्रसंचालन केले. एन. एच. पाटील यांनी आभार मानले.
हेही वाचा :
ठरलं! आयपीएलचा थरार ‘या’ दिवसापासून रंगणार
एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा ‘या’ प्लॅन ठरणार फायद्याचा; आता वैद्यकीय सेवेसाठी…
…तर ‘लाडक्या बहिणीं’कडून दंडासहीत रक्कम वसूल करण्यात येईल; भुजबळांचं मोठं विधान