गुजरातच्या उद्योगपती 200 कोटींची संपत्ती दान करुन घेतला संन्यास.
आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे, असं आपण मानतो. पैसा आहे तर सर्व काही आहे. पैसा असल्यावर आपल्याला आपलं मनासारखं आयुष्य जगता येतं. आपली स्वप्न पूर्ण करता येतात. हवी ती कार, हवी ती बाईक घेता येते. आपली इच्छा असेल तिथे फिरता येतं. स्वर्गासारखं आयुष्य जगता येऊ शकतं. पण काही माणसं फार वेगळे असतात. त्यांना भौतिक सुखांचा मोह नसतो. त्यांना ऐहिक वैभवाची गरज वाटत नाही. त्यामुळे ते फार शाश्वात आयुष्य जगण्याचा विचार करतात. त्यांना दुनियादारीशी फार घेणंदेणं वाटत नाही. त्यांना परमेश्वराशी एकरुप व्हावसं वाटतं. परमेश्वराची सेवा करावीशी वाटतं. देवाच्या नामस्मरणात तल्लीन व्हावसं वाटतं. यासाठी ते आपल्याकडच्या सर्व संपत्तीचा त्याग करायलाही तयार असतात. गुजरातच्या एका श्रीमंत उद्योगपतीने तसंच पाऊल उचललं आहे. गुजरातचे उद्योगपती भावेश भाई यांनी आपल्या 200 कोटींची संपत्ती दान करत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्याच्या हिंमतनगर येथे वास्तव्यास असणारे उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश यांनी आपल्या कोट्यवधीची संपत्ती दान केली आहे. त्यांनी संसाराच्या मोहाचा त्याग केला आहे. भावेश हे संपन्न कुटुंबात जन्मले आहेत. त्यांचं सर्व सुख-सोयी सुविधांमध्ये पालनपोषण झालं आहे. त्यांची जैन समाजात अनेकदा दीक्षार्थी आणि गुरुजनांसोबत भेट व्हायची. विशेष म्हणजे भावेश भाई यांचा 16 वर्षाचा मुलगा आणि 19 वर्षाच्या मुलीने दोन वर्षांआधीच सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा आणि दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांच्या निर्णयानंतर दोन वर्षांनी भावेश आणि त्यांच्या पत्नीनेही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भावेश सर्व गोष्टींचा त्याग करणार
भावेश यांनी संसाराचा मोह सोडून आपली जवळपास 200 कोटींची संपत्ती दान केली आहे. त्यांनी बिल्डिंग कंस्ट्रक्शनचा व्यवसायासह अहमदाबाद येथील कामकाज सोडून अचानक दीक्षार्थी बनण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश यांच्या परिचयाचे दिलीप गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जैन समाजात दीक्षाला खूप महत्त्व आहे. दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला भिक्षा मागून जीवन जगायचं असतं. यासोबतच एसी, पंखा, मोबाईल इत्यादी वस्तूंचा त्याग करावा लागतो. तसेच अनवानी पायांनी संपूर्ण भारतात फिरावं लागतं.
भावेश भाईंची हिंमतनगरमध्ये शोभायात्रा
भावेश भाई यांनी संन्यासी बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची हिंमतनगर येथे जंगी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती दान करुन टाकली. दान केलेली संपत्ती ही तब्बल 200 कोटी रुपयांची आहे. ही शोभायात्रा जवळपास 4 किमीपर्यंत चालली. याआधी भंवरलाल जैन यांचा दीक्षार्थी बनण्याचा निर्णय चर्चेत आला होता. त्यांनीदेखील आपली कोट्यवधींची संपत्ती दान करत दीक्षार्थी बनून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, भावेश भाई यांच्या परिचयाचे दिकुल गांधी यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. हिंमतनगच्या रिवर फ्रंट येथे एकाचवेळी 35 जण दीक्षार्थी म्हणून जीवन जण्यासाठी पदार्पण करणार आहेत.