‘गुंडाराज’वरून अहमदनगरचं राजकारण तापलं
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका- टिपण्णी केली जात आहे. अशात अहमदनगरच्या राजकारणात ‘गुंडाराज’वरून वातावरण तापलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात गुंडाराज वाढला आहे. या निवडणुकीत जनताच हा गुंडाराज संपवेल, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर केली होती. विखे पाटलांच्या या टीकेला निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लंकेंसोबतच राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. माझ्याविरोधात पंतप्रधानांसह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत. इथेच माझा विजय झालाय, असा टोला देखील निलेश लंके यांनी लगावला आहे.
निलेश लंके काय म्हणाले?
गुंडाराज कुणाचे हे सर्व जनतेला माहिती आहे. विखेंचा मतदारसंघ असलेल्या राहात्यात जाऊन पाहा गुंडाराज… कार्यकर्त्यांनी व्हॉटस्अप स्टेटस ठेवला तरी मारहाण केली जाते. माझ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक गुन्हा दाखल झाला आहे. गुंडाराज यांचाच असून पोलिस प्रशासनाचा वापर केला जातो. त्यामुळे जनताच यांना दाखवून देईल, असं निलेश लंके म्हणालेत.
अहमदनगरमध्ये नरेंद्र मोदींची सभा होतीये इथेच माझा विजय झाला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्यासाठी देशाचे प्रधानमंत्री आणि अनेक नेते येतायेत. माझा गुलाल फिक्स आहे. आपण प्रधानमंत्र्यांना टीव्हीवरच बघत होतो. ते माझ्या विरोधात प्रचारासाठी येतायेत. आपली किती ताकद वाढलीय, असा मिश्किल टोला निलेश लंके यांनी लगावला आहे.
प्राजक्त तनपुरे म्हणाले…
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या गुंडाराजवरच्या वक्तव्यावर भाष्य केलंय. विखे पाटलांना गुंडांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या आजूबाजूला, कडेवर गुंडच असतात.राहुरी मतदारसंघाच्या माजी आमदारावर इतके गुन्हे आहेत की ते तडीपार व्हायला पाहिजे. नगर शहरातले नावाजलेले गुंड यांच्याच मंचावर असतात. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात याचे आत्मपरिक्षण करा.नगर शहरात गुंड सर्वसामान्य लोकांच्या जमिनीचे ताबे घेतायेत. तुमच्या राज्यात काय चाललंय ते बघा… तुमचं राज्य थोड्याच दिवसाचं आहे, असं प्राजक्त तनपुरे म्हटलं आहे.