भाजपला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
सोलापूर : हद्दवाढ विभागात भाजपची(Political) पहिली शाखा सुरू केली. महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपात स्थान नाही. पक्षात नेत्यांची गटबाजी वाढली. पक्षापेक्षा स्वतःला मोठे असल्याचे नेत्यांना वाटणे हे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत पक्षात काम करणे अवघड आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आप्पासाहेब चौगुले यांनी सांगितले.
चौगुले यांनी शनिवारी भाजपच्या(Political) सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे दिला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना भाजपने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपच्याच माजी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर भाजपचे माजी विरोधी पक्ष नेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्त्यांची कदर नाही. त्यांना स्थान नाही. विचारात घेतले जात नाही, असे म्हटले.
तसेच आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अखेर भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. राजीनाम्याची प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही मेलद्वारे पाठवल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.
हद्दवाढ भागामध्ये तीस वर्षांपूर्वी भाजपची पहिली शाखा सुरू केली. पक्ष वाढवला. दरम्यानच्या काळात नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते पदही भूषविले. पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष केला. या परिसरात बूथ यंत्रणा सक्षम केली होती. गेल्या दहा वर्षांपासून भाजपामध्ये गटबाजी वाढली आहे. शिस्त राहिली नाही. संघटना विस्कळीत झाली आहे. मला लोक भाजपचा कार्यकर्ता मानतात. मात्र, दुसरीकडे आतापर्यंत झालेल्या विविध निवडणुकांवेळी पक्षातील पदाधिकारी, आमदार मला विसरले, असे त्यांनी सांगितले.
आमच्याकडे कोणीही आले नाही. तरीही मी पक्षाचे काम जबाबदारीने केले. दक्षिण मतदारसंघातील आमदार असूनही सुभाष देशमुख यांच्याशी कधीही साधे बोलणे झाले नाही. कधीही त्यांनी विचारले नाही. कालपर्यंत पक्षाची वाट पाहिली. सक्रिय व्हा असे म्हणतील अशी अपेक्षा होती. मात्र, कोणीही बोलावले नाही. सामाजिक भूमिका घेऊन राजकारणात काम करत आहे.
याशिवाय, पक्षापेक्षा नेत्यांना स्वतःचे राजकारण(Political) आणि गटबाजी महत्त्वाची वाटते. अशा परिस्थितीत काम करणे अवघड आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला मी कंटाळलो. त्यांनी पक्षात स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान नाही, असा आरोप चौगुले यांनी केला. स्वाभिमान गहाण ठेवून काम करणे मला शक्य नाही. आमदार देशमुख हे पक्षाचे नव्हे तर लोकमंगलचे नेते आहेत, असेच वाटते. माझ्यासारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही, असा आरोप चौगुले यांनी केला.
महापालिकेच्या इतिहासात भाजपला प्रथमच महापालिकेत सत्ता मिळाली. मात्र म्हणावे तसे काम करण्यात आले नाही. आलेली संधी घालवली. स्मार्ट सिटी योजना नेटक्या पद्धतीने राबवली नाही. यामुळे उलट पक्षाची प्रतिमा खराब झाली. पक्षापेक्षा स्वतः मोठा असे नेत्यांना वाटणे चुकीचे आहे. ते पक्षासाठी हानिकारक असते, असेही अप्पासाहेब चौगुले यांनी सांगितले.
हेही वाचा :
सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; यापुढे…
महाराष्ट्रातील भाजपा सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालते…
“म्हणून आम्ही मतदान करणार नाही”; सरकारला टाळ्यावर आणण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली शक्कल