बजरंग पुनिया डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला आहे. येत्या जुलै महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या ट्रायलपूर्वी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका सुत्राने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत म्हटले की, सोनीपतमध्ये झालेल्या ट्रायल्सदरम्यान बजरंग पुनियाने डोपिंग चाचणीसाठी जाण्यास नकार दिला होता. सोनीपत ट्रायल्समध्ये त्याला रोहित कुमारकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तो तिथून निघुन गेला. डोपिंग चाचणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला संपर्क करुन चाचणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडसाठी झालेल्या सामन्यासाठीही थांबला नव्हता. या ट्रायल्ससाठी त्याने रुसमध्ये सराव केला होता.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत निलंबन राहिल तोपर्यंत तो कुठल्याही स्पर्धेत किंवा ट्रायलमध्ये सहभाग घेऊ शकणार नाही. जर त्याच्या आरोपावर सुनवाई झाली नसेल, तर त्याला ऑलिम्पिकसाठी होणाऱ्या ट्रायल्समध्ये सहभाग घेण्यापासून थांबवलं जाऊ शकतं.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने १० मार्च रोजी बजरंग पुनियाकडे डोप टेस्टसाठी सँपल मागितले होते. मात्र बजरंग पुनियाने स्पष्ट नकार कळवला होता. बजरंग पुनियाने सँपल का नाही दिले याबाबत WADA (world anti doping agency) ने NADA ला स्पष्टीकरण मागितलं होतं. यावरुन WADA आणि NADA मध्ये चर्चा देखील सुरु होती. त्यानंतर २३ एप्रिल रोजी NADA ने बजरंग पुनियाला नोटीस पाठवली आहे. त्याला ७ मे पर्यंत उत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे.